ऑनलाईनच्या माध्यमातून कर भरणाऱ्यांची संख्या अधिक; 22 कोटी 25 लाख 43 हजार ऊपये कर जमा
बेळगाव : महापालिकेला यावर्षी जुलै अखेरपर्यंत 34 कोटी 4 लाख 59 हजार 822 रुपये कर जमा झाला आहे. एप्रिलपासून आतापर्यंत हा कर जमा झाला असून ऑनलाईनद्वारे 22 कोटी 25 लाख 43 हजार 300 रुपये कर जमा झाल्याची माहिती महापालिकेच्या महसूल विभागातून देण्यात आली. महापालिकेमध्ये ऑनलाईनद्वारे कर भरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. डिजिटललायझेशनमुळे अधिक तत्परतेने अनेकांनी कर भरला आहे. शहरामध्ये एकूण 1 लाख 54 हजार मालमत्ता आहेत. त्यामधील काहीजणांनी अजूनही कर भरला नसल्याचे सांगण्यात आले. तरीदेखील यावर्षी 34 कोटी रुपयांपेक्षाही अधिक कर जमा झाला आहे.
एप्रिल महिन्यात कर भरणाऱ्यांना 5 टक्के सवलत दिली जाते. कर भरल्यानंतर 5 टक्के रक्कम त्यांच्या पुन्हा खात्यावर जमा केली जाते. त्यानंतर दोन महिने कोणताही दंड नसताना कर आकारला जातो. जुलैपासून करावर दोन टक्के दंड आकारण्यात येतो. करासह आता ही रक्कम जमा झाल्याचेदेखील स्पष्ट करण्यात आले. महापालिकेच्या वेबसाईटवर ऑनलाईनद्वारे याचबरोबर बेळगाव वनच्या माध्यमातूनही घराचा कर भरला जातो. ऑनलाईनच्या माध्यमातून 22 कोटी 25 लाख 43 हजार 300 रुपये कर जमा झाल्याने डिजिटललायझेशनचा फायदा महापालिकेला झाल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी चलन भरून कर भरावा लागत होता. त्यामुळे बराच विलंब होत होता. मात्र आता ऑनलाईनच्या माध्यमातून घरमालक सहजरित्या कर भरत आहेत. त्यामुळे त्यांचा वेळेची बचत होत आहे. महसूल विभागाला दरवर्षी उद्दिष्ट दिले जाते. त्यामुळे कर भरण्याबाबत जनजागृती केली जाते. त्यानुसार जनताही सहकार्य करत आहे. 5 टक्के सवलत घेण्यासाठी एप्रिल महिन्यात अधिक प्रमाणात कर भरणाऱ्यांची संख्या असल्याचेही सांगण्यात आले. एकूणच महापालिकेने कराच्या बाबतीत समाधानकारक वसुली केली आहे. तरीदेखील काहीजणांनी 10 ते 15 वर्षांचा कर भरला नाही. काही न्यायालयीन प्रकरणे असल्यामुळे त्याठिकाणची करवसुली थांबली आहे, असे सांगण्यात आले.