प्रवाशांची गैरसोय : सुविधांपेक्षा असुविधांचाच करावा लागतोय सामना
बेळगाव : मध्यवर्ती बसस्थानकात पावसामुळे अंतर्गत भागाची दुर्दशा झाली आहे. परिसरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे ये-जा करणाऱ्या प्रवाशांना चिखलातूनच मार्ग काढावा लागत आहे. पावसाने सर्वत्र चिखल निर्माण झाला आहे. यातूनच बसचालकांना वाहने हाकावी लागत आहेत. त्यामुळे परिवहनचे वरिष्ठ अधिकारी लक्ष देणार का? असा प्रश्न सर्वसामान्य प्रवाशांना पडला आहे. शक्ती योजना सुरू झाल्यापासून महिला प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे. प्रवाशांना आपल्या बॅगा सावरत बसगाड्या पकडाव्या लागत आहेत. बसस्थानक स्मार्ट झाले मात्र चिखलाने हैराण केले, अशा संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांतून व्यक्त होत आहेत. दररोज हजारो प्रवाशांनी गजबजणाऱ्या बसस्थानकात अंतर्गत रस्त्याची समस्या निर्माण झाल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. बसस्थानकात सुरू असलेल्या विकासकामांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. सुसज्ज बसस्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल झाले आहे. मात्र प्रवाशांना सुविधांपेक्षा असुविधांचाच अधिक सामना करावा लागत आहे.









