राज्यपाल गेहलोत उपस्थित राहणार
बेळगाव : विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठ (व्हीटीयू) चा 23 वा दीक्षांत समारंभ मंगळवार दि. 1 ऑगस्ट रोजी होणार आहे. सकाळी 11.30 वाजता येथील व्हीटीयू सभागृहात पदवीदान समारंभ होणार आहे. या कार्यक्रमाला कर्नाटक राज्याचे राज्यपाल थावरचंद गेहलोत उपस्थित राहणार आहेत. आदी चुंचनगिरी महासंस्थान मंडळाचे जगद्गुरू डॉ. श्री निर्मलानंद स्वामीजी, राष्ट्रीय शिक्षण समिती ट्रस्टचे मानद सचिव डॉ. ए. व्ही. एस. मूर्ती व म्हैसूर येथील मेक्रॉन टाईल्स कंपनीचे अध्यक्ष एच. एस. शेट्टी यांना मानद डॉक्टरेट दिली जाणार आहे. या पदवीदान समारंभात 43 हजार 545 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र दिले जाईल. या कार्यक्रमाला चेन्नई येथील आयआयटी मद्रासचे प्रा. व्ही. कमाकोटी उपस्थित राहणार आहेत. राज्यपाल थावरचंद गेहलोत सकाळी 11.55 वाजता विमानाने सांबरा-बेळगाव विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर वाहनांनी व्हीटीयू येथील शासकीय विश्राम गृहामध्ये काही काळ विश्रांती घेतील व त्यानंतर दीक्षांत सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी सांबरा येथून विमानाने पुन्हा बेंगळूरला रवाना होणार आहेत.









