पुण्यात 18 जुलैच्या पहाटे पोलिसांनी संशयावरून हटकलेल्या तिघांकडे चौकशीतून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात ‘इसिस’ने पाऊल टाकल्याचे आणि दहशतवादी कारवाया सुरू झाल्याचे समजले आहे. पुण्यात, जिथे संरक्षण दलाच्या अनेक महत्त्वाच्या संस्था कार्यरत आहेत त्याच्या आसपास दहशतवादी आणि पाकिस्तानी यंत्रणेचे जाळे विणले जात आहे. डीआरडीओचा संचालक कुरुलकरला हनीट्रॅपमध्ये अडकवून महत्त्वपूर्ण माहिती सहज मिळते हा भारतीय व्यवस्थेचा लंपट आणि पोकळपणा उघड झालाच. पण, अशा अनेकांवर शत्रुराष्ट्रांकडून जाळे टाकले जात आहे. त्यात लोक फसत आहेत हे वास्तव एकीकडे आहे. तर दुसरीकडे धर्माच्या नावावर सुशिक्षित तरुणांचा आणि डॉक्टर, इंजिनिअर सारख्या उच्च व्यावसायिकांचा दहशतवादी कारवायांसाठी वापर सुरू असल्याचे आणि ते सुद्धा त्यात आनंदाने सक्रिय झाल्याचे दिसून आले आहे. मध्यप्रदेशातून जयपूरमध्ये दहशतवादी कारवाया केलेल्या लोकांना पकडून त्यांच्याकडे चौकशी केली असता इसिससाठी कार्यरत असणारा पुण्यातील भूलतज्ञ डॉ. अदनान अली उघड झाला. त्याच्याकडून दहशतवादी कृत्ये घडवण्यासाठी रेकी केल्याचे स्पष्ट झाले. पुणे पोलिसांनी पहिल्यांदा पकडलेल्या मो. इम्रान मो. युसुफ खान आणि मो. युनूस महंमदिया या राजस्थान पोलिसांकडे वॉन्टेड दहशतवाद्यांकडून कोंढव्यातील अब्दुल दस्तगीर पठाण या आश्रयदात्याचे नाव उघडकीस आले. राष्ट्रीय तपास यंत्रणेने केलेल्या चौकशीत आणि दहशतवाद विरोधी पथकाने केलेल्या चौकशीतून रत्नागिरी जिह्यातील काझी नावाचा एक अभियंता आर्थिक पाठबळ देतो हे समजले. या टोळक्याने पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिह्यातील जंगलात स्फोटकांच्या चाचण्या घेतल्या. तसे न्यायालयात सांगण्यातही आले आहे. पुण्यातील चौकडीकडे तशी स्फोटके, शस्त्रास्त्रs, रेकीसाठी लागणारी उपकरणे सापडली. दक्षिण महाराष्ट्रातील संस्था, इमारती, धरणे यांना बाधा पोहोचवली की मोठ्या भूभागाला दणका देऊन जगभर गहजब माजवण्याचा त्यांचा मनसुबा असू शकतो. सध्या पाकिस्तानात असेच गर्दीत स्फोट सुरू आहेत. अस्थिर स्थिती असे सहज घडवता येते. त्यासाठी हा प्रयत्न असू शकतो. भारताने अशा अनेक दहशतवादी संघटनांना नष्ट केले आहे. तरीही इसिससारख्या संघटनेचे आकर्षण सुशिक्षितात आहे. असा वर्ग सैरभैर होण्यामागे देशातील काही राज्यातील वातावरणसुद्धा कारणीभूत आहे. तारतम्यानेच हे समजू शकते. केवळ दोष देण्याने द्वेषच वाढतो हे समजले पाहिजे. तसेच या दहशतवादाचा तितक्याच कठोरपणे बिमोडही केला पाहिजे. बाऊ दाखवून अर्ध्या कच्च्या मडक्यांना फितवण्याचे काम करणारी यंत्रणा दोन्ही बाजूला कार्यरत आहे. तपास यंत्रणांना अशा कोणालाही सहज सोडत नाही. कारण प्रश्न राष्ट्रहिताचा असतो. त्याचमुळे या देशात एकीकडे वासनेला बळी पडून देशाची गुपिते उघड करणाऱ्या कुरुलकरला अटक होते. तर दुसरीकडे भूलतज्ञ अदनान अलीची दहशतवादी कारवायांसाठी तरुणाची माथी भडकवल्याच्या आणि त्यांना त्या मार्गावरून जाण्यास मदत केल्याप्रकरणी अटक होते. दोन्हीही प्रकार देशाच्या हितासाठी घातकच. पण सर्वसामान्यांनी सुद्धा आता डोळसपणे जगण्याची गरज आहे. मुंबईत, कुठल्यातरी निर्जन बेटाच्या किनारी दहशतवाद्यांचा वावर असतो असे 80-90 च्या दशकात म्हटले जात होते. 1993 मध्ये झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटावेळी हे दहशतवादी मुंबईच्या इकोसिस्टीमचा भाग बनले होते. यंत्रणांची नजर चुकवून परदेशातून आणलेल्या वस्तुंसाठी श्रीमंत वर्ग, पोलीस अधिकारी, अभिनेते, उद्योगपती, राजकारणी आणि त्यांचे कुटुंबीय यांना ते हवे होते.
बॉम्बस्फोट मालिकेनंतर पाकिस्तानला पळाले ते अजूनही सरकारच्या हाती लागले नाहीत. त्यांच्या अशा उघड वावराला कधीही कोणी गांभीर्याने घेतले नाही. त्यांनी एक सशक्त साखळी बनवली. ज्याचे परिणाम देश वेळोवेळी भोगतोय. आजही प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध तस्करी आणि भोगवादी व्यवसाय हे पोलिसांसह मान्यवरांना खुश करूनच चालतात. गावोगावी पसरलेले हे धोकादायक लोक कधीही पोलिसांच्या रडारवर येत नाहीत. अनेकदा तर अटीतटीच्या बंदोबस्तावरील पोलिसांना ते मदतही करतात, अन्न पोहोचवून पुण्यात्मा ठरतात! अर्थात याला खूप मोठ्या प्रमाणावर अपवाद आहेत. या फिल्मी गोष्टी नाहीत. अनेकदा देशाच्या प्रत्येक गावातील गल्ली कोपऱ्यावर मिळणारे ब्राऊन शुगर, एमडी सारखे अमली पदार्थ हे देशाच्या सीमा पार करून आपल्याकडे आलेले असतात. देशात एखाद्या फॅक्टरीमध्ये त्याचे उत्पादनही होत असते. त्याचे सगळे नियोजन अशा दहशतवाद्यांकडूनच लावलेले असते. इथली पिढी कमकुवत आणि बरबाद करणेही त्यांचा हेतू आहे. त्यामुळे प्रत्येक नाक्यावरील पोलिसालासुद्धा आपण एका आंतरराष्ट्रीय संघटनेशी 24 तास झुंजत आहोत आणि त्यांचा डाव उधळून लावणे हे आपले आद्य कर्तव्य आहे असे वाटले पाहिजे. मात्र प्रत्यक्षात
त्यांच्या गळ्यात पडणारे वरिष्ठ कनिष्ठाला नाउमेद करतात. सह्याद्रीच्या जंगलांमध्ये राहून आणि इथल्या धरणांची रेकी करून दहशतवाद्यांनी एक प्रकारे आपला मनसुबा उघड केला आहे. काही जागृत पोलिसांमुळे हे प्रकरण उघडकीस आले. पण केवळ धरणांचा आणि मोठ्या संस्थांचा बंदोबस्त वाढवून इसिसला पायबंद बसणार नाही. खूप कणखरपणे प्रत्येक घटकाला लढले पाहिजे. नागरिकांमधील ज्यांचे डोळे खुले आहेत आणि मेंदू जागे आहेत त्यांनी विचलीत न होता हे सत्य लोकांना समजावले पाहिजे. इसिस हे आव्हान आहेच. पण, ते अनेक पध्दतीने गोंधळ उडवणारे आहे. त्यांना जाणणारे अधिकारी पोलीस दलात हवेत. जनरल पोलिसिंग सशक्त हवे. एका लष्करी जवानाइतकी मानसिक, शारीरिक तयारी असणारे प्रशिक्षित अधिकारी, कर्मचारी ठिकठिकाणी तैनात हवेत आणि त्यांच्यापर्यंत वेळीच गुप्तवार्ता पोहोचल्याही पाहिजेत. तरच या दुष्टचक्रातून भविष्यात सुटका आणि दहशतवादावर मात होईल.








