सेन्सेक्समध्ये 367 अंकांची तेजी : एनटीपीसी तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
दोन सत्रातील घसरणीनंतर आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी भारतीय शेअरबाजार तेजीसमवेत बंद होण्यात यशस्वी झाला आहे. सेन्सेक्स 367 अंकांच्या तेजीसोबत बंद झाला असून एनटीपीसीचे समभाग सर्वाधिक 4 टक्के वाढले होते.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 367 अंकांच्या तेजीसह म्हणजेच 0.56 टक्केसह 66,527 अंकांवर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 107 अंकांच्या म्हणजेच 0.55 टक्के तेजीसह 19,753 अंकांवर बंद झाला होता. सोमवारी एनटीपीसीचे समभाग 4 टक्के वाढलेले होते तर सोबत पॉवरग्रिड कॉर्प यांचा समभाग 3 टक्के वाढत बंद झाला. ऑटो, ऑईल अँड गॅस, ऊर्जा, धातू, आयटी सेवा व कॅपिटल गुडस् निर्देशांक 1 ते 2 टक्के इतक्या तेजीसमवेत बंद झाले. तसेच एफएमसीजी निर्देशांक 0.5 टक्के इतका घसरणीत होता. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी 1 टक्का वाढीसह कार्यरत होते.
बीएसईवर टेक महिंद्रा, टाटा स्टील यांचे समभाग 2 टक्यापेक्षा जास्त तेजीत होते तर टीसीएसही 1.98 टक्के वाढीसह कार्यरत होता. याशिवाय विप्रो, मारुती सुझुकी, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा मोटर्स, एचसीएल टेक, इंडसइंड बँक, लार्सन टुब्रो आणि इन्फोसिस यांचे समभाग 1 टक्का वाढले हेते. यांच्यासह बजाज फिनसर्व्ह, रिलायन्स इंडस्ट्रिज, एसबीआय, टायटन, सन फार्मा आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांचे समभागही नफ्यासह बंद झाले होते. दुसरीकडे बजाज फायनान्स, कोटक महिंद्रा बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयटीसी, भारती एअरटेल आणि एशियन पेंटस यांचे समभाग मात्र घसरणीसह बंद होताना दिसले.
सेन्सेक्समधील 30 पैकी 23 समभाग तेजीसोबत आणि 7 घसरणीसह बंद झाले आहेत. अदानी ग्रीन एनर्जीने 2023-24 च्या पहिल्या तिमाहीतील निकाल घोषित केला असून नफा 51 टक्के वाढून 323 कोटी रुपयांवर पोहचला आहे. जागतिक बाजारात पाहता सर्व बाजार हे तेजीत होते. अमेरिका, युरोप व आशियाई बाजारात तेजी होती.