वार्ताहर /सावईवेरे
फोंडा तालुक्यात सद्या हिस्त्र प्राण्याचा लोकवस्तीजवळ संचार वाढू लागल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. केरी-फोंडा येथील पालसरे वाड्यावरील एका महिलेला गव्याने जखमी केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. निशा तुकाराम सतरकर असे जखमी महिलेचे नाव आहे. बेतकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपचार घेत असून तिच्या पायाला 21 टाके पडले आहे. सदर घटना शुक्रवार 28 रोजी घडली होती. निशा ही आपल्या बहीणीसमवेत डोंगराळ भागात अळंबीच्या शोधात गेली होती. यावेळी त्याच्यासमवेत तीन पाळीव कुत्रीही होती. जंगलात गव्याला पाहिल्यानंतर कुत्र्यांनी भुंकणे सुरू केले होते. गव्या कुत्राच्या पाठीमागे लागलेल्यामुळे एक कुत्रा निशाजवळ आला. यावेळी गव्याने कूत्र्यावर उगारलेले शिंग निशाच्या उजव्या पायावर बसून ती सुमारे 3 मिटर अंतरावर दूर फेकली गेली. बहीणीने कोयत्याचा धाक दाखविल्यानंतर गव्या तेथून पसार झाला. रक्तबंबाळ अवस्थेत तिला बेतकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. केरी येथील आमाडी, पालसरे वाड्यावर गव्याचे कायम वास्तव्य आहे. या भागातील बागायतदारांना फटका बसत आहे. ऐन बहरणाऱ्या मोसमात गव्याचा हौदस करून पिकाची नासाडी होत असल्याची तक्रारीला कृषी खात्याचे कर्मचारी कुठलीही दाद देत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. येथील रस्त्यावरूनही गव्याचे दर्शन अनेकांना झालेले आहे. वन खात्याने ग्रामस्थांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करावी अशी मागणी येथील स्थानिकांनी केली आहे.









