स्वातंत्र्यसैनिकांसह स्वातंत्र्ययोद्ध्यांचाही पदस्पर्श : फाशीची व्यवस्था असलेले राज्यातील एकमेव कारागृह
बेळगाव : स्वातंत्र्यपूर्व काळातील हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. शंभर वर्षांनंतरही कारागृहाच्या सुरक्षा भिंती दणकट आहेत. एक शतकात या कारागृहाने अनेक कुप्रसिद्ध आणि सुप्रसिद्ध कैद्यांना सामावून घेतले होते. 1923 मध्ये या कारागृहाचे काम पूर्ण झाले. दोन प्रवेशद्वारावरील दर्शनी कमानीवर 23 दगडी पाकळ्यांचे चित्र कोरले आहे तर आतील प्रवेशद्वारावर अशा 19 पाकळ्या आहेत. कर्नाटकातील एक अतिसुरक्षित कारागृह अशी त्याची ख्याती आहे. कारागृह विभागाकडे उपलब्ध माहितीवरून सुरुवातीला वीरभद्रनगर येथे उपकारागृह सुरू करण्यात आले होते. स्वातंत्र्यपूर्व काळात त्याचा दर्जा वाढवून सेंट्रल जेल करण्यात आले. 1908 मध्ये त्यावेळच्या मुंबई सरकारने हा निर्णय घेतला होता. तेव्हापासूनच हिंडलगा येथे नव्या कारागृहाचे बांधकाम सुरू झाले. 1922 पर्यंत ढोबळ ढाचा तयार झाला होता. 1923 ला संपूर्ण बांधकाम पूर्णत्त्वास आले. पुणे येथील येरवडा कारागृह, अंदमान-निकोबार व सोलापूर कारागृहाच्या धर्तीवर ही इमारत उभी करण्यात आली आहे. संपूर्ण कर्नाटकात फाशी देण्याची व्यवस्था सध्या याच कारागृहात आहे. येथील वधस्तंभावर एकावेळी तिघा जणांना फाशी देण्याची व्यवस्था आहे. स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत या कारागृहात 39 जणांना फाशी देण्यात आली आहे. 30 डिसेंबर 1947 रोजी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा महांतप्पा गंगाप्पा या खून प्रकरणातील कैद्याला फाशी देण्यात आली.
वीरप्पनच्या साथीदारांना फासी नाही जन्मठेप
9 नोव्हेंबर 1983 रोजी हणमंत मल्लयार या कैद्याला फाशी देण्यात आली. या कारागृहात झालेली ही शेवटची फाशी. त्यानंतर चंदन तस्कर वीरप्पनच्या साथीदारांना फाशी देण्यासाठी तारीख ठरली. तरी न्यायालयीन लढाईत त्यांना दिलासा मिळाला. फाशीचे रुपांतर जन्मठेपेत झाल्यामुळे त्यांना या कारागृहातून हलविण्यात आले. हिंडलगा मध्यवर्ती कारागृह या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. वेगवेगळ्या गुन्हेगारी प्रकरणातील खतरनाक गुन्हेगारांना या कारागृहात स्थानबद्धतेत ठेवण्यात येते. कर्नाटकातील कोणत्याही न्यायालयात कैद्यांना फाशीची शिक्षा ठोठावली तर अशा कैद्यांना याच कारागृहात हलविण्यात येते. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्यसैनिकांना ठेवले जायचे. स्वातंत्र्यानंतर अनेक नामचीन गुंडांना या कारागृहात ठेवण्यात आले आहे. एकूण 99 एकर 5 गुंठे जमिनीवर कारागृह व त्याच्याशी संलग्न इतर इमारती आहेत. कारागृहाची मुख्य इमारत 22 एकर 39 गुंठ्यांमध्ये वसली आहे. 23 एकर इतकी शेतजमीन आहे. तर कारागृहातील बाहेरचा परिसर 53 एकर 6 गुंठे जमिनीत वसला आहे. 18 फूट उंच आवार भिंत आणि त्या भिंतीवर विद्युतभारीत तारा आहेत. कारागृहात सुरक्षारक्षकांचा पहारा असतो. तर कारागृहाबाहेर कर्नाटक राज्य औद्योगिक सुरक्षा विभागाचे जवान तैनात असतात. आंतरराष्ट्रीय बिकिनी किलर चार्ल्स शोभराज, अंडरवर्ल्ड डॉन बन्नंजे राजा, छोटा शकीलचा हस्तक रशीद मलबारी, कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनचे साथीदार ज्ञानप्रकाश, बिल्वेंद्र, मिसेकर मादय्या, सायमन आदी अनेक कुख्यात गुन्हेगारांना या कारागृहात स्थानबद्धतेत ठेवण्यात आले आहे. 1,162 कैद्यांना ठेवण्याची क्षमता असलेल्या या कारागृहात रविवारी सायंकाळपर्यंत 930 कैदी होते.
फाशीची शिक्षा झालेल्या कैद्यांचे कारागृह
फाशीची शिक्षा झालेल्या कैद्यांना याच कारागृहात ठेवण्यात येते. सध्या फाशीचे एकूण 26 कैदी आहेत. संपूर्ण राज्यात एकेकाळी ज्या दंडुपाळ्या टोळीतील गुन्हेगारांनी हैदोस घातला होता, त्या टोळीतील बारा गुन्हेगारांना याच कारागृहात ठेवण्यात आले आहे. फाशीची शिक्षा रद्द होईपर्यंत वासनांध उमेश रे•ाrही याच कारागृहात होता. दिनदार अंजुमन सिद्दीकी, सिमीच्या हस्तकांना याच कारागृहात ठेवण्यात आले आहे.
अंधार कोठडीत 28 कक्ष
कारागृहात स्वतंत्र अंधार कोठडी आहे. अंधार कोठडीत 28 कक्ष आहेत. फाशीची शिक्षा ठोठावल्यानंतर अशा कैद्यांना या बराकीत ठेवण्यात येते. हजार कैद्यांना जेवण बनविण्यासाठी भटारखानाही आहे. कैद्यांना ठेवण्यासाठी कारागृहात वेगवेगळे विभाग आहेत. आजारी कैद्यांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र इस्पितळही आहे. 20 खाटांच्या या इस्पितळात डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. कैद्यांसाठी रोज सकाळी नाष्टा, दुपारी व रात्रीचे जेवण पुरविले जाते. रोज एक मेनू असतो. सोमवारी नाष्ट्याला टोमॅटो भात, जेवणात चपाती, भात आणि डाळीची आमटी, रात्रीच्या जेवणात चपाती, भात, कडधान्याची आमटी असते. असा रोजचा आहार असतो. महिलांसाठी स्वतंत्र विभाग असून कैद्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाते. हिंडलगा कारागृहात तयार झालेले जमखाना, फर्निचर व सजावटीच्या वस्तूंना मागणी आहे. कारागृहात 38 गायी पाळण्यात आल्या आहेत. या गायींचे दूध कारागृहासाठी वापरण्यात येते.
कारागृहाला देशप्रेमींचे वलय
या कारागृहात अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. ‘मोहरा’, ‘रोज’, ‘खतरनाक’, ‘क्रोध’ आदी हिंदी चित्रपट. ‘मिंचीनवोट’, ‘वीरप्प नायका’, ‘दोडमने हुडगा’ आदी कन्नड चित्रपटांचे चित्रीकरणही या कारागृहात झाले आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी द. रा. बेंद्रे, माजी पंतप्रधान गुलजारीलाल नंदा, सरदार वल्लभभाई पटेल यांची कन्या मनीबेन पटेल, माजी केंद्रीय गृहमंत्री मृदुलाबेन साराभाई, अ. भा. काँग्रेसचे माजी सचिव रावसाहेब पटवर्धन यांच्यासह 300 हून अधिक आंदोलकांना या कारागृहात ठेवण्यात आले होते. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनाही हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात ब्रिटिशांनी स्थानबद्ध केले होते. 4 एप्रिल 1950 ते 13 जुलै 1950 या काळात सावरकर याच कारागृहात होते. याची नोंद कारागृहातील दस्तावेजांमध्ये आहे.
कारागृहाचे सुधारगृह
कारागृहाचे मुख्य अधीक्षक कृष्णकुमार म्हणतात, शंभर वर्षांनंतरही हे कारागृह भक्कम आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्यसैनिकांना स्थानबद्धतेत ठेवण्यासाठी व स्वातंत्र्यानंतर गुन्हेगारांना ठेवण्यासाठी या कारागृहाचा वापर झाला आहे. 1932 च्या जून महिन्यात प्रसिद्ध कवी द. रा. बेंदरे यांना त्यांच्या ‘नरबली’ या कवितेमुळे कारावास झाला होता. याच कारागृहात त्यांना ठेवण्यात आले होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनाही ब्रिटिशांनी या कारागृहात ठेवले होते. हे या कारागृहाला ऐतिहासिक महत्त्व आहे. कारागृहाचे सुधारगृह व्हावे, या महात्मा गांधीजींच्या तत्त्वानुसार कारागृहाचे कामकाज सुरू आहे.
– कारागृहाचे मुख्य अधीक्षक कृष्णकुमार