विज्ञान शिक्षकांचे सहकार्य घेण्याचा सरकारचा आदेश
बेळगाव : डेंग्यू निवारणासाठी आरोग्य खात्याकडून विज्ञान विषयाच्या शिक्षकांची मदत घेण्यात आली आहे. जिह्यामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी आरोग्य खात्याकडून 600 शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. विज्ञान परिषद, आरोग्य खाते आणि शिक्षण खात्याच्या साहाय्याने डेंग्यू निवारण्यासाठी उपाययोजना राबविण्याचा आदेश सरकारने दिला आहे. त्यानुसार शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. पावसाळ्यामध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढून नागरिकांना अनेक आजारांचा सामना करावा लागतो. यामध्ये प्रामुख्याने डेंग्यू रुग्णांची संख्या अधिक वाढते. या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य खात्याकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. राज्यामध्ये पहिल्यांदाच विज्ञान शिक्षकांना प्रशिक्षण देऊन डेंग्यूबाबत जनजागृती करण्यासाठी सहकार्य घेण्यात आले आहे.
या आजाराबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यासाठी विज्ञान शिक्षक अधिक प्रभावी ठरतील. तसेच विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घरोघरी जागृती करण्यासाठीही सोयीचे होईल, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला असल्याचे आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. डासांपासून हा आजार होतो. डासांची उत्पत्ती, वाढत जाणारी पैदास, उद्भवणारे आजार याची माहिती विज्ञान शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यास सोयीचे ठरणार आहे. यासाठी विज्ञान शिक्षकांचे सहकार्य घेण्यात येत आहे. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांकडून डासांमुळे डेंग्यू आजार कसा होतो, याचे मॉडेल बनवून घेतले जाणार आहेत. उत्कृष्ट मॉडेलना जिल्हास्तरीय पुरस्कार देण्यात येणार आहे.
असा उपक्रम पहिल्यांदाच- डॉ. एम. एस. पल्लेद (जिल्हा रोग नियंत्रण अधिकारी)
राज्य सरकारच्या आदेशानुसार विज्ञान शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिह्यात 600 शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून डेंग्यू आजाराची माहिती घरोघरी पोहोचविण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी सोयीचे ठरणार असल्याने पहिल्यांदाच असा उपक्रम राबविण्यात आला आहे.









