अर्चना माने-भारती / पुणे :
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे जुलै महिन्यात पाऊस धो-धो बरसला असून, पावसाने देशासह महाराष्ट्राचीही सरासरी ओलांडली आहे. यात राज्यात सरासरीच्या 56 टक्के अधिक, तर देशभरात 7 टक्के अधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे.
जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने देशभरासह अनेक राज्यांत पावसाची तूट नोंदविण्यात आली. मात्र, जुलै महिन्यात मान्सूनच्या पोषक स्थितीमुळे देशभर सर्वदूर पावसाने हजेरी लावली. पूर्वेकडची राज्ये वगळता सर्वत्र राज्यांत पावसाची स्थिती समाधानकारक आहे. यात हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात, तेलंगणा, गोवा राज्यात सरासरीच्या 60 टक्के अधिक, अतिरिक्त पाऊस झाला आहे. याबरोबरच जम्मू-काश्मीर, पंजाब, दिल्ली, उत्तराखंड, राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, अंदमान-निकोबार बेटांवर अतिरिक्त पावसाची नोंद झाली असून, सरासरीच्या 20 ते 59 टक्के अधिकचा पाऊस झाला आहे.
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात समाधानकारक
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, नागालॅन्ड, केरळ, तामिळनाडू राज्यात सरासरीच्या उणे 19 ते अधिक 19 टक्क्यांदरम्यान पाऊस नोंदविण्यात आला आहे.
पूर्वेकडची राज्ये तुटीत
पूर्वोत्तर राज्ये तसेच पूर्वेकडच्या काही राज्यांत तुटीचा पाऊस झाला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाची क्षेत्रे निर्माण तर झाली, पण याचा प्रभाव पूर्व किनारपट्टी, मध्य भारत तसेच पश्चिम किनारपट्टीवर अधिक जाणवला. तसेच पूर्व व पूर्वोत्तर भारतात पावसाचा खंडही अधिक होता. यामुळे या भागात पावसाने ओढ दिली आहे. यात बिहार सरासरीच्या उणे 49, झारखंड उणे 48, पश्चिम बंगाल उणे 31, आसाम उणे 38, मेघालय उणे 35, मिझोराम उणे 37, त्रिपुरा उणे 31 पाऊस झाला आहे.
मणिपूर अवर्षणात
मणिपूर तसेच दमण दीव या भागात अवर्षणाची स्थिती आहे. मणिपुरात सरासरीच्या उणे 60, तर दमण दीव येथे उणे 94 टक्के पाऊस झाला आहे.
महाराष्ट्रात जुलैमध्ये पाऊस चांगला
1 जुलै ते 30 जुलै या कालावधीतील पावसामुळे सर्वच जिल्हय़ांत पावसाने सरासरी गाठली आहे. यात पालघर, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर,नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, जळगाव जिल्हय़ांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सरासरीच्या 60 टक्क्यांहून अधिक पाऊस येथे झाला आहे.
कोल्हापूर, सांगली, रत्नागिरीत अतिरिक्त पाऊस
कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, पुणे, नाशिक, धुळे, बीड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशिम, गडचिरोली, भंडारा, नागपूर, वर्धा जिल्हय़ांत अतिरिक्त पावसाची नोंद होत सरासरीच्या 20 टक्के ते 59 टक्के अधिकच्या दरम्यान पाऊस झाला आहे.
सातारा, नगरमध्ये समाधानकारक पाऊस
सातारा जिल्हय़ात सरासरीइतका, नगर सरासरीच्या 18 टक्के अधिक, औरंगाबाद 19, बुलढाणा उणे 1, नंदुरबार 8, अमरावती 18, गोंदिया उणे 3 इतका पाऊस जुलै महिन्यांत नोंदविण्यात आला आहे.
कमी कालावधीत जोरदार पाऊस
जुलै महिन्यात कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भातील काही भागांत मुसळधार पाऊस झाला. जुलैचे पहिले दोन आठवडे राज्याला पावसाची प्रतीक्षा होती. मात्र, शेवटच्या दोन आठवडय़ात झालेल्या मुसळधार पावसाने सरासरी भरून काढली आहे. मराठवाडा विभागात या कालावधीत पावसाचे प्रमाण किमानच राहिले. यामुळे यातील बहुतांश जिल्हय़ांनी कशीबशी सरासरी गाठली आहे.








