बेळगाव : हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील एका कच्च्या कैद्यावर स्क्रू ड्रायव्हरने हल्ला करण्यात आला आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली असून, जखमी कैद्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेने कारागृहात काही काळ धावपळ उडाली. सुरेश ऊर्फ साईकुमार नागलिंगय्या (वय 31) असे त्याचे नाव आहे. मंड्या जिल्ह्यातील बंडीगे नविलु पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात झालेल्या एका गुन्हेगारी प्रकरणात सुरेशला अटक झाली असून गेल्या तेरा महिन्यांपासून हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात त्याला ठेवण्यात आले आहे. शनिवारी दुपारी तो आपल्या सेलमध्ये झोपलेला असताना त्याच्यावर हल्ला झाला आहे. कच्च्या कैद्यांना ठेवण्यात येणाऱ्या बराकीत ही घटना घडली आहे. याच बराकीत राहणाऱ्या शंकराप्पा बजंत्री या कैद्याने स्क्रू ड्रायव्हरने सुरेशवर हल्ला केला आहे. सुरुवातीला जखमी सुरेशवर हिंडलगा कारागृहातील इस्पितळात उपचार करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.
हल्ल्याचे निश्चित कारण समजू शकले नाही
जखमी सुरेशने दिलेल्या फिर्यादीवरून शंकराप्पा बजंत्री याच्यावर भादंवि 324, 506 कलमान्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर कारागृहाचे मुख्य अधीक्षक कृष्णकुमार व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्ल्याचे निश्चित कारण समजू शकले नाही. बेळगाव ग्रामीणचे प्रभारी पोलीस निरीक्षक विजयकुमार शिन्नूर पुढील तपास करीत आहेत.









