अन्यथा व्यापारी वर्ग आंदोलनाच्या तयारीत : खरेदीदार, शेतकरी-व्यापारी वर्गाला ट्रकांच्या आडोशामुळे नाहक त्रास : एपीएमसीत सोयीसुविधांची वानवा
वार्ताहर /कंग्राळी खुर्द
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील प्रवेशद्वारातील मुख्य रस्त्याच्या उत्तरेकडील खुल्या जागेवर असलेले ट्रकांचे स्थानक अन्यत्र हलवावे, अशी येथील व्यापारीवर्गाची आग्रहाची मागणी आहे. या ट्रक थांब्यामुळे येथील व्यापारी बांधवांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याची दखल कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने घ्यावी आणि या ट्रकथांब्याचे स्थलांतर करावे, या मागणीला व्यापारी बांधवांमधून जोर धरत आहे. बाजार समिती प्रवेशद्वारातील मुख्य रस्त्याच्या उत्तरेकडे खुल्या जागेत गेल्या अनेक वर्षांपासून ट्रक थांबविण्यात येत आहेत. त्या ठिकाणच्या गाळेधारकांकडून बाजार समितीत वर्षाकाठी लाखो रुपये भाडे स्वरुपात महसूल मिळत असतो. त्यामुळे या गाळेधारकांना बाजार समितीने सोयीसुविधा पुरवणे गरजेचे असताना याकडे डोळेझाक करून जास्ती जास्त सुविधा पुरविण्यास बाजार समिती अपयशी ठरल्याचा आरोप गाळेधारकांकडून करण्यात येत आहे.
दुकानांचे अस्तित्वच नष्ट
दुकान गाळेधारकांना दुकाने देताना आणि प्लॉटधारकांना प्लॉट देताना दर्शनी बाजूची दुकाने आहेत म्हणून भाडे पण जादा अकारण्यात आले आहे. शिवाय प्लॉटची रक्कमसुद्धा जादा घेण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी बेकायदेशीर ट्रकथांबा करण्यात आल्याने प्रवेशद्वारातून दुकानेच दिसत नाहीत. दुकाने असूनसुद्धा अनेकदा नवीन खरेदीदार, शेतकरी व व्यापारी वर्गाला ट्रकांच्या आडोशामुळे वेढा घालून दुकानात यावे लागत असल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी बाजार प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन येथील ट्रक थांबविण्यास मनाई करावे, अन्यथा येथील व्यापारी मोठ्या आंदोलनाच्या तयारीत असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
उच्चांकी दरासहित प्लॉटची विक्री
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मुख्य प्रवेशद्वारातील उत्तरेकडील खाली जागा ही ज्यावेळी बाजार समितीची सुरुवात करण्यात आली त्यावेळी ही जागा बाजारासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. याची नोंद बाजार समितीमधील रेकॉर्डमध्ये आहे. शिवाय या ठिकाणी जे प्लॉटधारक आहेत त्यावेळी त्यांना सर्वांपेक्षा जादा रक्कम घेऊन प्लॉटची विक्री केली आहे. मात्र भागाला सोयीसुविधा पुरविण्यास बाजार समिती आतापर्यंत अपयशी ठरली आहे. त्यामुळे व्यापारी वर्गामधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
दुकानांसमोरच कचरा आणि बाटल्यांचा खच
बाजार समितीमध्ये अनेक राज्यातून ट्रकचालक माल घेऊन येतात. दुकानांमध्ये कांदा, बटाटा, रताळी, कडधान्ये खाली झाल्यानंतर या ठिकाणी खाली ट्रक थांबविले जातात. याच ठिकाणी ट्रकमधील केरकचरा टाकण्यात येतो. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये धूळ तर पावसात चिखलाचे साम्राज्य निर्माण झालेले असते. त्यातच प्लास्टिक पिशव्यांमधून खाण्याचे पदार्थ आणले जातात ते याच ठिकाणी खाऊन खाली पिशव्या, मद्यपान केलेल्या बाटल्या फेकून देतात. याचा त्रास येथील गाळेधारकांना होत आहे. रात्रीच्या वेळी गाळेधारकांच्या दारातच दारुच्या बाटल्या व खाण्याच्या पदार्थातील टाकाऊ पदार्थ टाकत असतात. त्यामुळे व्यापारी आणि गाळेधारकांना सकाळी आल्याबरोबर अंगणातील स्वच्छता करूनच दुकान उघडावे लागत आहे. त्यामुळे व्यापारी वर्गातून तीव्र नाराजी पसरली आहे.









