कारवार किनारपट्टीवर 1 जूनपासून लादलेली बंदी आजपासून उठविणार : मच्छीमारी बांधवांमध्ये समाधान : खवय्याकडूनही ताज्या मासळीची प्रतीक्षा
कारवार : यांत्रिक होडीद्वारे खोल समुद्रात करण्यात येणाऱ्या मासेमारीवर प्रशासनाने 1 जूनपासून लादलेली बंदी 31 जुलैपासून उठविण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून ठप्प झालेल्या मासेमारीच्या हंगामाला 1 ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. परिणामी जिल्ह्यातील कारवार, अंकोला, कुमठा, होन्नावर व भटकळ तालुक्यातील मच्छीमारी समाज नवीन हंगामाला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाला आहे. गेल्या दोन महिन्यापासून निर्मनुष्य दिसून येणारी जिल्ह्यातील कारवार (बैतखोल) मुदगा, बेटेकेरी, दडी, होन्नावर, भटकळ आदी मच्छीमारी बंदरे होड्यांच्या दाटीने व मासेमारी बांधवांच्या उपस्थितीने गजबजून जाणार आहेत.
जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील पाच तालुक्यातील सुमारे बारा हजार कुटुंबे मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहेत. मच्छीमारी समाजासाठी तर हा एकमेव व्यवसाय. मासेमारीच्या ऐन हंगामात या व्यवसायामुळे प्रत्येक दिवशी कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असते. सरकारी नियनामुसार 1 जूनपासून 31 जुलैपर्यंत यांत्रिक होडीद्वारे खोल समुद्रात करण्यात येणाऱ्या मासेमारी व्यवसायावर बंदी असते. या कालावधीत पारंपारिक पद्धतीने करण्यात येणाऱ्या मासेमारीला परवानगी असते. हे खरे असले तरी, अशा प्रकारे करण्यात येणाऱ्या मासेमारीचे प्रमाण अतिशय अल्प असते. जून, जुलै महिन्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत असल्याने समुद्र खवळलेला असतो. मासेमारी बांधवांच्या आणि मासेमारीसाठी वापरण्यात येणाऱ्या होड्या, जाळी आणि अन्य साहित्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून खोल समुद्रातील मासेमारीवर बंदी घातली जाते. त्याहून महत्त्वाचे म्हणजे या कालावधीत मासळीची संतान उत्पती होत असते आणि म्हणून बंदी आवश्यक असते.
एक ऑगस्टची प्रतीक्षा
गेल्या दोन महिन्यात मच्छीमारी बांधवांनी नवीन होड्या आणि जाळी खरेदी करणे, जाळ्यांची, होड्यांची दुरूस्ती, रंगरंगोटी आदी कामे पूर्ण केली आहेत. सरकारकडून होड्यांना सवलतीच्या दरात डिझेल उपलब्ध करून दिले जाते. त्याकरिता मच्छीमारी बांधवांनी डिझेल पास बुक तयारीत ठेवले आहे. मासेमारी व्यवसाय करण्यासाठी खेळत्या भांडवलाचीही आवश्यकता असते. त्याकरिता खेळत्या भांडवलाचीही तरतूद करून ठेवली आहे. आता प्रतीक्षा आहे ती एक ऑगस्ट उगवण्याची आणि व्यवसायाबद्दल स्वप्ने उराशी बाळगून खोल समुद्रात उतरण्याची.
होम पूजा अर्चा
दरम्यान काही मच्छीमारी बांधवांनी बंदरामध्ये नांगरण्यात आलेल्या होड्यामध्ये होम, पूजा, अर्चा करून व्यवसायाला चांगले दिवस लाभावे आणि होडीवरील मजुरांच्या सुरक्षिततेसाठी समुद्र देवाकडे प्रार्थना केल्याचे सांगण्यात आले. कारण खोल समुद्रात मासेमारी करीत असताना मच्छीमारी बांधवांनी अनेक संकटांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत समुद्रच त्यांचा करता आणि करविता असतो.
मासळीप्रेमींचे ताज्या मासळीकडे लक्ष
गेल्या काही वर्षापासून वेगवेगळ्या कारणामुळे प्रामुख्याने नैसर्गिक कारणामुळे मासेमारी व्यवसाय बेभरवशाचा बनून राहिला आहे. कोरोनाने तर या व्यवसायाचे कंबरडेच मोडले होते. त्यामुळे यावर्षी तरी मासळीचा हंगाम बऱ्यापैकी होऊ दे अशी अपेक्षा मच्छीमारी समाजाकडून आणि मासळी प्रेमींकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान गेल्या दोन महिन्यापासून सुक्या मासळीवर समाधान मानलेले मासळीप्रेमी एक ऑगस्टला बाजारपेठेत दाखल होणाऱ्या ताज्या मासळीकडे टक लाऊन बसले आहेत.









