मात्र अजूनही काही भाग पाण्याखाली असल्याने पिके कुजण्याची भीती
बेळगाव : दोन दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे आता पूर ओसरु लागला आहे. बळ्ळारी नाला परिसरातील शिवाराला पुराचा विळखा निर्माण झाला होता. मात्र आता पावसाने विश्रांती घेतल्यामुळे काही भागातील पाणी ओसरु लागले आहे. मात्र बळ्ळारी नाल्याला लागून असलेल्या जमिनीमध्ये पाणी अजूनही साचून असल्यामुळे भात कुजून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरू झालेल्या या पावसामुळे बळ्ळारी नाला परिसराला पूर आला होता. हजारो एकर जमीन पाण्याखाली गेली होती. भातपीक पाण्याखाली असल्यामुळे कुजून जाण्याची भीती व्यक्त होत होती. मात्र आता पावसाने विश्रांती घेतल्याने भातपीक पाण्यातून बाहेर पडत आहे. त्यामुळे काहीसा दिलासा शेतकऱ्यांना मिळाला आहे. येळ्ळूर रस्त्याला लागून असलेल्या वडगाव, शहापूर, अनगोळ शिवारातील काही जमिनीमध्ये मात्र अजूनही पाणी साचून आहे. पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे या जमिनीतील पीक कुजून जाण्याची भीती अजूनही व्यक्त होत आहे. आता बऱ्याच प्रमाणात पाणी ओसरताना दिसत आहे. पाऊस गेला तर सर्व पूर ओसरुन दिलासा मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.









