वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चीनमधील चेंगडू येथे सुरू असलेल्या विश्व विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत भारताने चौथे सुवर्णपदक मिळवले. स्पर्धेच्या गुणतक्त्यात भारत आता चौथ्या स्थानावर आहे. भारताने या स्पर्धेतील चौथे सुवर्ण तिरंदाजी क्रीडा प्रकारात मिळवले.
भारताच्या अमन सैनी आणि प्रगती यांनी मिश्र सांघिक कंपाऊंड प्रकारात सुवर्णपदक मिळवताना प्रतिस्पर्ध्याचा 157-156 अशा केवळ एका गुणाच्या फरकाने पराभव केला. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत 4 सुवर्ण, दोन रौप आणि 4 कास्य अशी एकूण 10 पदकांची कमाई करत चौथे स्थान मिळवले आहे. तिरंदाजी या क्रीडा प्रकारात भारताने आणखी दोन पदकांची कमाई केली. पुरुष आणि महिलांच्या सांघिक कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात भारताने हे यश मिळवले आहे. पुरुषांच्या सांघिक कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात संगमप्रित बिस्ला, अमन सैनी व ऋषभ यादव यांनी दक्षिण कोरियाचा 229-225 असा पराभव करत कास्यपदक मिळवले. तर महिलांच्या सांघिक कंपाऊंड प्रकारात भारताच्या पूर्वशा, प्रगती आणि अवनीत यांना अंतिम फेरीत कोरियाकडून हार पत्करावी लागल्याने त्यांना रौप्यपदक मिळाले. कोरियाने भारताचा 229-224 असा पराभव केला.
भारताच्या विजयवीर, उदयवीर सिद्धू व आदर्श सिंह यांनी 25 मी. रॅपिड फायर पिस्तूल सांघिक नेमबाजीत रौप्यपदक मिळवताना 1729 गुण मिळवले. त्याचप्रमाणे 50 मी. रायफल्स सांघिक नेमबाजीत भारताच्या प्रताप, सरताज सिंग व ऐश्वर्य तोमर यांनी 583 गुणासह कास्यपदक मिळवले. 25 मी. रॅपिड फायर पिस्तूल नेमबाजीत विजयवीरने वैयकितक गटात अंतिम गाठली आहे तर 50 मी. रायफल वैयक्तिक नेमबाजी प्रकारात भारताच्या ऐश्वर्याने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे.









