‘मन की बात’मधून पंतप्रधानांचे आवाहन : शहिदांच्या सन्मानार्थ ‘मेरी माती, मेरा देश’ मोहीम
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार, 30 जुलै रोजी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. मन की बातचा 103 वा भाग सकाळी 11 वाजता प्रसारित झाला. या कार्यक्रमात शहिदांच्या सन्मानार्थ ‘मेरी माती, मेरा देश’ मोहीम राबवण्याची घोषणा त्यांनी केली. तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर 15 ऑगस्ट रोजी ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्याचे आवाहनही त्यांनी केले.
गेल्यावषी स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण देश ‘हर घर तिरंगा अभियाना’साठी एकत्र आला होता. त्याचप्रमाणे यावेळीही प्रत्येक घराघरात तिरंगा फडकवायचा आहे आणि ही परंपरा पुढे चालू ठेवायची आहे, असे आवाहन पंतप्रधानांनी मन की बातमधून केले आहे. ‘हर घर तिरंगा’मुळे आम्हाला आमच्या कर्तव्याची जाणीव होईल. देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या अगणित बलिदानाची जाणीव होईल. स्वातंत्र्याची किंमत कळेल. त्यामुळे प्रत्येक देशवासियाने या प्रयत्नात सहभागी झाले पाहिजे, असेही ते पुढे म्हणाले.
‘मेरी माती, मेरा देश’ अंतर्गत देशासाठी हुतात्मा झालेल्यांच्या स्मरणार्थ देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. हुतात्म्यांच्या स्मरणार्थ देशातील लाखो ग्रामपंचायतींमध्ये विशेष शिलालेखही लावण्यात येणार आहेत. शहीद वीर आणि नायिकांचा सन्मान करण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात येणार आहे. ‘मेरी माती, मेरा देश’ अभियानांतर्गत देशभरात ‘अमृत कलश यात्रा’ही काढण्यात येणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. देशाच्या कानाकोपऱ्यातून 7,500 कलशांमध्ये माती वाहून ही यात्रा देशाची राजधानी दिल्लीत पोहोचेल. या प्रवासात देशाच्या विविध भागातून रोपेही आणली जाणार आहेत. 7,500 कलशांमध्ये आलेली माती आणि वनस्पतींनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाजवळ अमृत वाfिटका बनवली जाणार आहे.
‘अमृत कलश यात्रा’ मोहिमेसंबंधी बोलताना पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशातील वृक्ष अभियानाचे कौतुक केले. उत्तर प्रदेशात एका दिवसात 30 कोटी झाडे लावण्याचा विक्रम झाला आहे. राज्य सरकारने अभियान सुरू केल्यानंतर जनतेने ते पूर्ण केले. हे प्रयत्न लोकसहभागासह जनजागृतीचे उत्तम उदाहरण असल्याचे सांगत ‘झाडे लावा आणि पाणी वाचवा’ अशा अभियानांमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हायला हवे, असेही पंतप्रधानांनी पुढे सांगितले.
#social
अमेरिकेने शंभरहून अधिक दुर्मिळ आणि प्राचीन कलाकृती आम्हाला परत केल्या आहेत. या कलाकृती 250 ते 2500 वर्षे जुन्या आहेत. ते देशाच्या विविध प्रांतातील आहेत. 2016 आणि 2021 मध्ये जेव्हा मी अमेरिकेला गेलो होतो तेव्हाही अनेक कलाकृती भारतात परत करण्यात आल्या होत्या. ही बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर या कलाकृतींबाबत बरीच चर्चा झाल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले.