वृत्तसंस्था/ एर्नाकुलम
केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्dयात 5 वर्षीय मुलीची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली आहे. आरोपीने मुलीचा मृतदेह पोत्यात भरून डंपिंग ग्राउंडमध्ये फेकला होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तो बिहारचा रहिवासी आहे.
बलात्कार अन् हत्येची घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली आहे. केरळ पोलिसांनी याप्रकरणी जाहीरपणे माफी मागितली आहे. ‘माफ कर मुली, तुझी आईवडिलांशी गाठ घालून देण्याचा आमचा प्रयत्न अयशस्वी ठरला’ असे केरळ पोलिसांनी ट्विट करत म्हटले आहे.

मुलीचा मृतदेह तिच्या शाळेत ठेवण्यात आला, तेथे शेकडो लोकांनी तिला श्रद्धांजली वाहिली आहे. आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी लोकांकडून होत आहे. मुलीच्या मृतदेहावर रविवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुलीचे शुक्रवारी संध्याकाळी अपहरण झाले होते. पोलीस पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर मुलीला आरोपीसोबत पाहिले गेले हेते. त्याचदिवशी रात्री 9.30 वाजता आरोपीला अटक करण्यात आली होती. त्यावेळी तो मद्यधुंद स्थितीत होता आणि मुलगी त्याच्यासोबत नव्हती अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक विवेक कुमार यांनी दिली आहे.
स्थानिक लोकांनी मुलीला बाजारपेठेनजीक आरोपीसोबत पाहिले होते. त्यांनी पोलिसांना यासंबंधी माहिती दिली होती. पोलिसांनी पूर्ण परिसरात शोध घेतला असता बाजारामागे मुलीचा मृतदेह मिळाला होता. या भागात लोकांकडून कचारा फेकला जातो तसेच अनेक लोकांकडून या जागेचा वापर नशेसाठी केला जातो.
आरोपी हा बिहारचा रहिवासी असून केरळमध्ये मजुरी करत होता. मुलीचे आईवडिल देखील बिहारचे असून ते देखील मजुरी करतात. आरोपी ज्या इमारतीत राहायचा, त्याच इमारतीत मुलगी स्वत:च्या आईवडिलांसोबत राहत होती.









