पंतप्रधानांकडून धोका व्यक्त : हायब्रिड हल्ल्याची भीती
वृत्तसंस्था/ वॉर्सा
रशियात सत्तापालट घडवून आणण्याचा प्रयत्न केलेल्या वॅगनर आर्मीचे सदस्य आता पोलंडच्या सीमेच्या दिशेने वाटचाल करत आहेत. पोलंडचे पंतप्रधान माटुस्ज मोराविकी यांनी याची माहिती दिली आहे. बेलारुसमध्ये असलेल्या रशियाच्या खासगी सैन्याचे 100 सदस्य पोलंडच्या सीमेनजीक पोहोचल्याचे त्यांनी सांगितले आहे.
अवैध घुसखोरीमुळे सीमाक्षेत्र पोलंडच्या सरकारसाठी चिंतेचे कारण ठरले होते. अशा स्थितीत वॅगनर सैनिकांनी पोलंडच्या चिंतेत भर टाकली आहे. स्थिती आता धोकादायक होत चालल्याचे पोलंडच्या पंतप्रधानांनी म्हटले आहे.
रशिया आणि बेलारुस स्थलांतरितांचा वापर पोलंड अन् युरोपच्या अन्य देशांना अस्थिर करण्यासाठी करत आहेत. यापासून वाचण्यासाठी पोलंडने बेलारुसच्या सीमेवर एक भिंत निर्माण केली आहे. आता स्थिती अधिकच धोकादायक होत चालली आहे. आता आम्हाला हायब्रिड हल्ल्याची भीती वाटतेय. युक्रेनसाटी लेपर्ड रणगाड्यांची दुरुस्ती केल्या जाणाऱ्या ठिकाणीच हा धोका निर्माण झाल्याचे पंतप्रधान मोराविकी यांनी म्हटले आहे.
हायब्रिड अटॅक म्हणजे काय?
जमिनीखाली रहस्यमय विस्फोट, सायबर हल्ले आणि देशाच्या लोकशाहीला बदनाम करण्यासाठी राबविण्यात आलेली छुपी ऑनलाईन मोहीम या सर्व ‘हायब्रिड धोक्यां’चा हिस्सा आहे. कुठल्याही देशाच्या महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधेवर हल्ला करण्याचा प्रकार हायब्रिड अटॅकमध्ये मोडतो. यात सरकार निवडण्यासाठी कुठल्याही देशात होणाऱ्या निवडणुकीतील हस्तक्षेपही सामील आहे.
पोलंडकडून सैनिक तैनात
वॅगनर सैनिक बेलारुसमध्ये पोहोचल्यावर पोलंडने स्वत:च्या सुरक्षेसी अतिरिक्त सैनिक सीमेवर तैनात केले आहेत. पोलंडने बेलारुस विरोधात कुठलीही कारवाई केल्यास तो रशियावरील हल्ला मानला जाईल. रशिया सर्वप्रकारे बेलारुसला मदत करणार असल्याचे ब्लादिमीर पुतीन यांनी म्हटले आहे.









