युक्रेन शांतता परिषदेचे आयोजन : भारतासह 30 देश सामील होणार
►वृत्तसंस्था/ रियाध
सौदी अरेबिया ऑगस्ट महिन्यात युक्रेनकडून प्रस्तावित एका शांतता परिषदेचे आयोजन करणार आहे. जेद्दा येथे होणाऱ्या या परिषदेत रशिया-युक्रेन संपुष्टात आणण्यासाठी चर्चा सुरू करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. परिषदेशी निगडित अधिकाऱ्याने ओळख न जाहीर करण्याच्या अटीवर या बैठकीत युक्रेनसोबत भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकाही सामील होणार आहे. तर अमेरिकेच्या जो बिडेन प्रशासनाकडून एक उच्च अधिकारी या परिषदेत सामील होण्याची अपेक्षा आहे. परंतु रशियाला या परिषदेकरता निमंत्रित केले जाणार आहे. युक्रेनकडून या परिषदेसाठी तयारी केली जात असल्याचे समजते.
ही परिषद 5-6 ऑगस्ट रोजी होणार असून यात 30 देश सामील होणार आहेत. मे महिन्यात युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी जेद्दा येथे झालेल्या अरब लीगच्या परिषदेत भाग घेतला होता. त्यांनी रशिया-युक्रेन युद्धादरम्यान स्वत:च्या देशासाठी पाठिंबा मागितला होता. युक्रेनवरील स्वत:ची नजर हटविलेल्या लोकांनी एकदा प्रामाणिकपणे युद्धाची स्थिती समजून घ्यावी. आम्हाला शांतता अन् न्याय हवा आहे. शत्रूकडे आमच्या तुलनेत क्षेपणास्त्रांचा मोठा साठा आहे. इराण युद्धात रशियाला शस्त्रास्त्रs पुरवत आहे. आमच्याकडे फारशी शस्त्रास्त्रs नसली तरीही आम्ही निर्धाराने लढत आहोत कारण सत्याची बाजू आमची असल्याचे उद्गार झेलेंस्की यांनी काढले होते.
सौदी अन् रशियाचे संबंध
सौदी अरेबिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. आम्ही परस्पर सहकार्याला एका नव्या उंचीवर नेण्यास तयार आहोत असे झेलेंस्की यांनी म्हटले होते. सौदी अरेबियाने चालू वर्षाच्या प्रारंभी युक्रेनला 400 दशलक्ष डॉलर्सची मदत करणार असल्याचे जाहीर केले होते. तसेच युद्ध संपुष्टात आणावे अशी मागणी करणाऱ्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रस्तावाला सौदी अरेबियाने समर्थन दिले होते. परंतु कच्च्या तेलाच्या व्यापाराप्रकरणी सौदी अरेबिया आता रशियासोबत जोडला गेला आहे. कच्चे तेल उत्पादन देशांची संघटना ओपेच्या कच्चे तेल उत्पादनात कपात करण्याच्या निर्णयानंतर रशिया आणि सौदीने परस्परांना सहकार्य केले आहे. यावरून अमेरिकेने सौदी अरेबियावर रशियाला साथ दिल्याचा आरोप केला होता. अमेरिकेच्या अनेक अधिकाऱ्यांनी कच्च्या तेलाच्या उत्पादनात घट करून सौदी अरेबियाला रशियाला साथ देत असल्याचा आरोप केला होता.
आफ्रिकन देशांचा शांतता प्रस्ताव
यापूर्वी मागील महिन्यात आफ्रिकन देशांनी रशिया आणि युक्रेनसमोर युद्ध संपविण्याच्या उद्देशाने शांतता प्रस्ताव सादर केला होता. या देशांमध्ये दक्षिण आफ्रिका, इजिप्त, कोमोरोस, सेनेगल, झाम्बिया, यूगांडा आणि रिपब्लिक ऑफ कांगोचे नेते सामील होते. रशियाचे सैन्य जोपर्यंत आमच्या क्षेत्रातून परतत नाही तोवर रशियासोबत कुठल्याही प्रकारची चर्चा होऊ शकत नाही. रशियाने आमचा भूभाग परत केल्यावरच हे युद्ध थांबू शकते असे म्हणत झेलेंस्की यांनी आफ्रिकन नेत्यांचा शांतता प्रस्ताव निरर्थक असल्याची टिप्पणी केली होती.









