ओटीटीवर 10 ऑगस्टला झळकणार
लोकप्रिय वेबसीरिज ‘मेड इन हेवन’चा पहिला सीझन 2019 मध्ये सादर करण्यात आला होता. प्रेक्षकांनी याला मोठी पसंती दर्शविली होती. आता चाहत्यांना याच्या दुसऱ्या सीझनची प्रतीक्षा लागून राहिली आहे. सीरिजच्या निर्मात्या झोया अख्तर यांनी याच्या दुसऱ्या सीझनची घोषणा जुलैच्या प्रारंभी केली होती. आता ही सीरिज कुठल्या दिवशी प्रदर्शित होणार याची माहिती समोर आली आहे. या सीरिजचे दिग्दर्शन अलंकृता श्रीवास्तव, नीरज घायवान, नित्या मेहरा, रीमा कागती आणि जोया अख्तर यांनी केले आहे.

तर सीरिजची निर्मिती फरहान अख्तर आणि रितेश सधवानी यांच्या एक्सेल मीडिया अँड एंटरटन्मेंटने टायगर बेबी प्रॉडक्शन हाउससोबत मिळून केली आहे. मेड इन हेवन या सीरिजचा दुसरा सीझन 10 ऑगस्ट रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. दिल्लीच्या पार्श्वभूमीवर आधारित या सीरिजमध्ये मोठ्या भव्य पद्धतीने आयोजित होणाऱ्या भारतीय विवाह सोहळ्यांमधील बडेजाव अत्यंत सुंदरपणे दाखविण्यात आला आहे. या सीरिजसाठी अभिनेत्री शोभिता धुलिपालाचे मोठे कौतुक झाले होते. आता तिच्यासोबत मोना सिंह आणि इश्वाक सिंह हे नवे कलाकार यात दिसून येतील.









