तारळे/ प्रतिनिधी
तारळे (तालुका पाटण) परिसरात जून महिन्याच्या अखेरीस पावसाने सुरुवात केली. सुरुवातीस पावसाला जोर नव्हता. जुलै महिन्याच्या पंधरवड्यात पावसाचा जोर वाढला. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने तारळी धरणाने 85 टक्के ची पाणीसाठा पातळी ओलांडली. 85% लाच धरणाची सांडवा पातळी असल्याने धरणातून या आठवड्यामध्ये 1232 क्युसेस प्रति सेकंद विसर्ग नदीपात्रात सुरू झाला आहे.
धरणामध्ये पहिलाच 50 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने, धरण 85 टक्के लवकर भरले. अगोदरच व्यवस्थापनाने पाण्याचा विसर्ग केव्हा सुरू होईल असा इशारा नदीकाठच्या गावांना दिला होता.
परिसरात सध्या पावसाचा जोर कायम आहे व नदीपात्रामधून पाण्याचे विसर्ग सुरू असल्याने नदी पाणी पातळी वाढली आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना व्यवस्थापनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. धरण पाणीसाठा क्षमता 5.85 टीएमसी आहे. या धरणामध्ये सध्या 4.96 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण परिसरात आजपर्यंत 734 मिलिमीटरच्या वर पावसाची नोंद झाले आहे. प्रति सेकंद 3810 पाणीसाठा धरणामध्ये येत आहे. तारळे परिसरामध्ये पुरेसा पाऊस झाल्याने शेतकरी समाधानी झाला आहे.









