प्रतिनिधी,कोल्हापूर
Kolhapur News : काळम्मावाडी जलसिंचन प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या कामात 40 कोटींच्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी जबाबदार असलेल्या कार्यकारी अभियंता विनया बदामे यांना निलंबित करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.तसेच तापी पाटबंधारे महामंडळाचे मुख्य अभियंता ज.द.बोरकर यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करत एक महिन्यात याप्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
कोल्हापूर जिह्यातील दूधगंगा (काळम्मावाडी) आंतरराज्य प्रकल्पाच्या डावा कालवा विस्तारीकरण 32 ते 76 कामांमध्ये ठेकेदारास 40 कोटी रुपयांची अतिरिक्त देयके दिल्याची बाब आमदार प्रकाश आबिटकर यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून विधानसभेमध्ये उपस्थित केली.यावेळी त्यांनी संबंधित अधिकारी यांनी शासन नियम बाजूला ठेवून ठेकेदारास 40 कोटी रुपयांची देयके परस्पर दिल्याबद्दल दूधगंगा कालवे विभाग क्र.1 च्या कार्यकारी अभियंता बदामे यांना निलंबित करण्याची मागणी सभागृहात केली होती. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित कार्यकारी अभियंता यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश विधानसभेत दिलेत.









