पोलिसात फिर्याद, गैरप्रकार सुरूच
प्रतिनिधी/ बेळगाव
गृहलक्ष्मी योजनेच्या नोंदणीसाठी लाभार्थींकडून पैसे उकळण्याचे प्रकार सुरूच आहेत. शनिवारी अथणी तालुक्यातील अवरखोड येथील ग्रामवन केंद्राला टाळे ठोकण्यात आले असून यासंबंधी पोलिसात फिर्यादही दाखल करण्यात आली आहे.
अथणीचे बालविकास अधिकारी अशोक बंडू कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हालाप्पा बीराप्पा लोकुर, रा. अवरखोड याच्यावर भादंवि 188, 409, 420 कलमान्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अथणीचे पोलीस निरीक्षक रवींद्र नायकोडी याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.
हालाप्पा लोकुर हा अवरखोड येथील ग्रामवन केंद्रातील कॉम्प्युटर ऑपरेटर आहे. गृहलक्ष्मी योजनेसाठी नोंदणी करताना प्रत्येकाकडून 100 रुपये वसुली करीत होता. यासंबंधी तक्रारी येताच शनिवारी अधिकाऱ्यांच्या एका पथकाने अवरखोडला भेट देऊन ग्रामवन केंद्रावर छापा टाकला. तपासणीवेळी लाभार्थींकडून पैसे उकळण्यात येत असल्याचे आढळून आले.
नोंदणीसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारू नये, अशी स्पष्ट सूचना महिला व बाल कल्याणमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी वारंवार करूनही अनेक सेवाकेंद्रांवर पैसे उकळण्याचे प्रकार सुरूच आहेत. त्यामुळे असे प्रकार करणाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. शनिवारी अवरखोड येथील ग्रामवन केंद्राला टाळे ठोकून संबंधिताविरुद्ध अथणी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.









