वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हांगझाऊ येथे 23 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशियाई खेळांतील स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली, तरच त्यात खेळू शकणार आहे. पुरुष आणि महिला गटांत भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश हे चार संघ 1 जून रोजीच्या ‘आयसीसी’ टी20 क्रमवारीच्या जोरावर थेट उपांत्यपूर्व फेरीत खेळतील. सर्व सामन्यांना अधिकृत ‘टी20’चा दर्जा असेल.
नुकत्याच बांगलादेशविऊद्धच्या एकदिवसीय सामन्यातील पंचांच्या निर्णयावर उघडपणे नाराजी व्यक्त केल्याने हरमनप्रीतवर दोन सामन्यांची बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे हरमनप्रीत उपांत्यपूर्व फेरीत खेळण्यास अपात्र बनलेली आहे. सदर फेरीतील सामना निश्चितपणे सहयोगी राष्ट्राच्या संघाविरुद्ध असेल आणि त्यानंतर पूर्ण सदस्य असलेल्या देशाच्या संघाविरुद्ध उपांत्य फेरीतील सामना होईल.
ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील पुऊष संघालाही 1 जून रोजीच्या आयसीसी टी20 क्रमवारीच्या आधारे थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला आहे. पुऊषांच्या स्पर्धेत 18 संघांचा, तर महिलांच्या स्पर्धेत 14 संघांचा समावेश असेल. महिला गटातील क्रिकेटची स्पर्धा 19 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि 26 सप्टेंबर रोजी सुवर्णपदक आणि कांस्यपदकांचे मानकरी ठरविणारे सामने होतील. तर पुऊषांची स्पर्धा 28 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि अहमदाबादमध्ये विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर दोन दिवसांनी 7 ऑक्टोबरला अंतिम सामना खेळविला जाईल.
जर भारतीय पुरुष क्रिकेट संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरला, तर त्याला 5 ऑक्टोबर (उपांत्यपूर्व), 6 ऑक्टोबर (उपांत्य फेरी) आणि 7 ऑक्टोबर (अंतिम सामना) असे लागोपाठ तीन सामने खेळावे लागतील. उपांत्यपूर्व फेरीत भारताचा मुकाबला अफगाणिस्तान किंवा बांगलादेशच्या दुय्यम संघाविऊद्ध होण्याची शक्यता दाट आहे, कारण दोन्ही देशांचे मुख्य संघ त्या वेळी विश्वचषकासाठी भारतात असतील. उद्घाटन समारंभ सुरू होण्यापूर्वी पुऊष क्रिकेट संघ आशियाई खेळांच्या ग्राममध्ये दाखल होण्याची शक्यता नाही. कारण त्यावेळी त्यांची मोहीम सुरू होण्यास जवळपास दोन आठवड्यांचा वेळ असेल. तसेच क्रिकेट संघ ‘गेम्स व्हिलेज’मध्ये राहील की, शहरातील पंचतारांकित हॉटेलात राहील याबाबत बीसीसीआयने अद्याप पुष्टी केलेली नाही.









