जागतिक व्याघ्र दिन : 11 वाघांचे अस्तित्व असल्याचे स्पष्ट : नैसर्गिक अधिवासात वाढ
सुनील राजगोळकर /बेळगाव
जंगलातील निर्धास्त चाल… काळजाचा थरकाप उडविणारी डरकाळी… यासारखी गुणवैशिष्ट्यो असलेल्या वाघांच्या अधिवासावर आक्रमण झाले आहे. त्यामुळे ही डरकाळी लुप्त होणार की काय? अशी धास्ती निर्माण झाली होती. मात्र अशा परिस्थितीतही वनक्षेत्रातील अस्तित्व सुरक्षित रहावे आणि गगनभेदी डरकाळी नेहमी घुमावी, यासाठी वनखात्याचे प्रयत्न सुरू आहेत. बेळगाव विभागात तब्बल 11 वाघांचे अस्तित्व असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज जागतिक व्याघ्र दिनानिमित्त बेळगाव विभागातील वाघांचा घेतलेला आढावा… वनक्षेत्रातील वाघांची निर्धिष्ठ संख्या समजावी. यासाठी गतवर्षी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्थेमार्फत व्याघ्र गणती करण्यात आली. वनविभागाच्या माहितीनुसार खानापूर परिसरात 8 पट्टेरी वाघांचे अस्तित्व आहे. शेजारील महाराष्ट्र आणि गोवा राज्यातून ये-जा करणारे 3 वाघ आहेत. वनक्षेत्रात वाढ झाल्याने साहजिकच नैसर्गिक अधिवास वाढला आहे. त्यामुळे वाघांच्या संख्येत वाढ झाली आहे. खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्य, लोंढा, खानापूर, कणपुंबी, नागरगाळी आदी वनक्षेत्र जैवविविधतेने नटले आहे. यामध्ये घनदाट वनराई, बांबूचे अच्छादन, हिरवेगार गवत आणि बारमाही वाहणारे पाणी. यामुळे वाघांची संख्या टिकून आहे. शिवाय वाघांचे खाद्य म्हणून ओळखले जाणाऱ्या चितळ, सांबर आणि हरणाची संख्याही वाढली आहे. वनक्षेत्रात वाघाबरोबर बिबटे, हत्ती, अस्वल, गवे, रानडुक्कर, साळिंद्र, तरस, कोल्हे, हरडण, सांबर, मोर आदी वन्यप्राण्यांचे अस्तित्वही स्पष्ट झाले आहे.
वनखात्यामार्फत विविध उपाययोजना
वन्यप्राण्यांचे संवर्धन व्हावे यासाठी खात्यामार्फत विविध उपाययोजना आखण्यात आली आहे. यामध्ये राखीव वनक्षेत्र ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नैसर्गिक अधिवास वाढून वन्य प्राण्यांची संख्या टिकून राहात आहे. विशेषत: वन्य प्राणी संरक्षण कायद्यानुसार शिकार आणि इतर गोष्टींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे वन्य प्राण्यांबरोबर वाघांची संख्या हळुहळू वाढू लागली आहे. व्याघ्र संवर्धन आणि संरक्षणामुळे निसर्ग समृद्ध होऊ लागला आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांचे संवर्धन होत असल्याचे अधोरेखित होऊ लागले आहे. गतवर्षी व्याघ्र गणनेत वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी खानापूर वन्य प्रदेश पिंजून काढला आहे. तब्बल 130 कॅमेरे, सेन्सर, ट्रॅक, सीसी कॅमेरे, पायाचे ठसे आणि विष्टेवरून वाघांच्या नोंदी घेतल्या आहेत. यानुसार बेळगाव विभागातील वाघांचा आकडा स्पष्ट झाला आहे. वनखात्याच्या मार्गसूचीनुसार दर चार वर्षातून एकदा व्याघ्र गणना केली जाते. गतवर्षी वैज्ञानिक पद्धतीने वाघांची गणना करण्यात आली आहे.
वन्य प्राण्यांसाठी भुयारी मार्गाची व्यवस्था करा
मानव आणि वन्य प्राण्यांच्या संघर्षात वन्य प्राण्यांचे निष्पाप बळी जाऊ लागले आहेत. विशेषत: रेल्वेखाली सापडून दरवर्षी शेकडो गव्यांचा मृत्यू होऊ लागला आहे. यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन वन्य प्राण्यांसाठी वनक्षेत्रात भुयारी मार्गाची व्यवस्था करावी, अशी मागणीही वन्यप्रेमीतून होऊ लागली आहे.
विविध वन्यक्षेत्रातील वाघांची संख्या
- वन्य प्रदेश वाघांची संख्या
- भीमगड 3
- लोंढा 2
- कणपुंबी 2
- नागरगाळी 2
- गोल्याळी 2
वनक्षेत्राचे संवर्धन करणे प्रत्येकाचे कर्तव्य
अलीकडच्या काही वर्षात व्याघ्र संवर्धनामुळे वाघांची संख्या वाढू लागली आहे. वन्यप्राण्यांचे संवर्धन होण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. लोंढा, कणकुंबी, नागरगाळी, भीमगड या वन्य प्रदेशात वाघांचे अस्तित्व आहे. वन्यप्राणी आणि वनक्षेत्र हे आपले दागिने असल्याने त्याचे संवर्धन करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. प्राण्यांच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी सीसी कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
संतोष चव्हाण, एसीएफ वनखाते खानापूर.









