दुकानगाळे पडून : लिलाव प्रक्रियाही खोळंबलेलीच : मनपाचे दुर्लक्ष
बेळगाव : खासबाग नाथ पै सर्कल येथे बैठ्या किरकोळ विक्रेत्यांसाठी उभारण्यात आलेले दुकानगाळे अद्याप लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत कोट्यावधी रुपये खर्चून उभारण्यात आलेले हायटेक दुकानगाळे वापराविना पडून आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांतून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. बसवेश्वर सर्कलजवळ स्मार्ट सिटी अंतर्गत किरकोळ विक्रेत्यांसाठी 140 दुकानगाळे उभारण्यात आले आहेत. भाजी, फळ विक्रेते आणि इतर लहान सहान बैठ्या विक्रेत्यांसाठी हे गाळे दिले जाणार आहेत. मात्र अद्याप याचा लोकार्पण सोहळा रेंगाळला आहे. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांना रस्त्याच्या शेजारीच ठाण मांडून भाजी विक्री करावी लागत आहे. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्नदेखील निर्माण होत आहे. या हायटेक दुकान गाळ्याचे काम पूर्ण होऊन एक वर्षाचा कालावधी उलटला तरी अद्याप उद्घाटन झाले नाही. शिवाय लिलाव प्रक्रिया करण्यासाठीदेखील हालचाली होताना दिसून येत नाहीत.
अद्याप रस्त्यावरच बाजार
स्मार्ट सिटी अंतर्गत या दुकान गाळ्यांचे बांधकाम करून मनपाकडे हस्तांतर झाले आहे. मात्र मनपाकडून पुढील कारवाई थांबली आहे. त्यामुळे हे गाळे अद्याप उद्घाटनाविना पडून आहेत. या ठिकाणी पूर्वी रविवारचा बाजार भरायचा, मात्र किरकोळ विक्रेत्यांसाठी उभारण्यात आलेले गाळे अद्याप उपलब्ध करून देण्यात आले नाहीत. त्यामुळे शेजारी असलेल्या रस्त्यावर बाजार भरू लागला आहे. भाजीपाला, फळ व इतर बैठ्या विक्रेत्यांची समस्या दूर करण्यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत हायटेक हॉकर झोन तयार केला आहे. रस्त्याच्या दुतर्फा काँक्रीट घातले आहे. शिवाय वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी विक्रेत्यांना पदपथ तयार केले आहेत.
दुकानगाळे लवकरच कार्यान्वित…
किरकोळ विक्रेत्यांसाठी हायटेक बाजार गाळे उभारण्यात आले आहेत. वापरासाठी एक योजना तयार केली जाणार आहे. त्यानंतर दुकानगाळे लवकरच कार्यान्वित केले जाणार आहेत.
अशोक दुडगुंटी, मनपा आयुक्त.
विश्वासात न घेता गाळे उभारल्याने अडचण…
हा हायटेक दुकान गाळे प्रकल्प अयशस्वी झाला आहे. त्यामुळे उद्घाटन रखडले आहे. कोणालाही विश्वासात न घेता हे गाळे उभारण्यात आले आहेत. त्यामुळे अडचणी वाढू लागल्या आहेत.
रवि साळुंखे, नगरसेवक.









