अन्यथा उग्र आंदोलन छेडू : कारवार शहर-ग्रामीण महिला मोर्चातर्फे इशारा
कारवार : उडुपी येथील ‘त्या’ तीन विद्यार्थिनींना ताब्यात घेऊन 10 दिवसांच्या आत कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही तर भाजपच्या कारवार जिल्हा मोर्चातर्फे कर्नाटक बंदद्वारे उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा येथील कारवार शहर आणि ग्रामीण महिला मोर्चातर्फे देण्यात आला. गुरुवारी कारवार जिल्हाधिकारी गंगुबाई मानकर यांची भेट घेऊन सादर करण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी उडुपी येथील एका खासगी पॅरा मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तीन विद्यार्थिनींनी हिंदूधर्मिय विद्यार्थिनींचे स्वच्छतागृहात चित्रिकरण केले आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्या आहेत. ही घटना अतिशय घृणास्पद आणि निंदनीय आहे. त्या तीन विद्यार्थिनींच्या विरोधात काही दिवसांपूर्वी तक्रार दाखल करण्यात आली आहे. तथापि, त्या विद्यार्थिनींवर अद्याप ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्या तीन विद्यार्थिनींच्या हीन कृत्यामुळे भारतीयांना खाली मान घालण्याची वेळ आली आहे, असे निवेदनात नमूद केले आहे. या घटनेमागे काही अदृश्य शक्तींचे मनसुबे दडलेले आहेत. केरळमध्ये लव्ह जिहादसाठी प्रयत्नशील असलेल्या आपल्या धर्मातील पुरुषाशी संधान साधून हिंदू महिलांची लाजलज्जा लुटण्यासाठी या विद्यार्थिनी प्रयत्नशील असल्याची शक्यता नाकारता येत नाही. काही महिन्यांपूर्वी जेव्हा संपूर्ण देशात हिजाब प्रकरण गाजत होते त्यावेळीही उडुपी हे शहर चर्चेत होते. आणि म्हणूनच गुप्तपणे स्वच्छतागृहात हिंदू विद्यार्थिनीचे चित्रिकरण करणाऱ्या त्या तीन विद्यार्थिनींना कायद्याच्या चौकटीत कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी प्रमीला लोटलीकर, रोशनी मालसेकर, श्वेता भटकळवार, वैशाली तांडेल, सुवर्णा गावकर, भाग्यश्री नाईक, वासंती गुणगी, दीपाली नाईक, स्नेहा गावकर, शुभांगी शिरोडकर, श्रेया पुरलेवार आदी उपस्थित होत्या.









