जळगाव / प्रतिनिधी :
केंद्र सरकारच्या उडान (उडे देश का आम नागरिक) या प्रादेशिक कनेक्टिव्हीटी योजनेअंतर्गत गोव्याच्या एव्हीएशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या एफएलवाय -91 ब्रँडखाली जळगावहून पुण्यासाठी विमान सेवा सुरू होत असून, हीच सेवा पुढे गोवा, हैदराबादपर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे अधिकृत वृत्त आहे.
जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांनी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे यासाठी सतत प्रयत्न केले होते. जळगावहून मुंबई, अहमदाबाद अशी विमानसेवा सुरू होती. मात्र कोराना काळात ती बंद पडली. त्यानंतर गेले दोन वर्ष जळगावची विमानसेवा बंद आहे. राज्य शासनाकडून सेवा सुरू होण्याबाबत प्रयत्न केले गेले नाहीत. अजिंठा हे जळगावपासून केवळ 55 किमी असल्याने पर्यटनाच्या दृष्टीने अधिक सोयीचे ठरते. उद्योग क्षेत्राला विमानसेवा महत्त्वाची ठरते. असे असताना सध्या केवळ शासकीय विमाने या विमानतळावर उतरत आहेत. जळगावला दोन मंत्री असताना लोकप्रतिनिधींच्या राजकीय उदासीनतेमुळे विमानसेवा सुरू होत नव्हती.
जळगावहून मुंबई, पुणे, इंदौर, अहमदाबादसाठी विमानसेवेची मागणी आहे. हे लक्षात घेऊन जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांनी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यास यश आले असून, एफएलवाय-91 या कंपनीने जळगाव पुणे उडाण-5 या योजनेअंतर्गत ही सेवा सुरू करण्यास उत्सुकता दाखवली आहे. या योजनेअंतर्गत कंपनीस तोटा आल्यास केंद्र सरकारकडून उणीव निधी पुरविला जाणार आहे त्यामुळे ही सेवा निरंतर सुरू राहणार आहे. या सेवेस प्रतिसाद मिळाल्यानंतर हीच सेवा गोवा, हैदराबादपर्यंत वाढवली जाणार असल्याचे समजते. उडान-5 योजनेत विमान कंपनीला तोटा होत नसल्याने ही सेवा यशस्वी होईल, असे दिसत आहे.








