लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी?
बेळगाव : लोकसभेच्या निवडणुका होण्यास अद्याप सात ते आठ महिन्यांचा कालावधी आहे. परंतु, निवडणुकीच्या तयारीसाठी महानगरपालिकेने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. शुक्रवारी कुमार गंधर्व रंगमंदिर येथे महानगरपालिका व्याप्तीतील बीएलओ व अंगणवाडी शिक्षिकांना घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यासाठीचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. निवडणुका दूर असल्या तरी महापालिकेने आतापासूनच कंबर कसली आहे. शहरातील मतदार नोंदणी तसेच मतदान ओळखपत्रातील बदल याची जबाबदारी त्या त्या विभागातील सरकारी शाळांमधील शिक्षकांना दिली आहे. याचबरोबर काही अंगणवाडी शिक्षिकांवरही ही जबाबदारी देण्यात आली आहे. शुक्रवारी महापालिकेच्यावतीने बीएलओ व अंगणवाडी शिक्षिकांना निवडणुकीसंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, उपायुक्त भाग्यश्री हुग्गी, प्रशांत हनगुंडी व शहर गटशिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ यांच्या उपस्थितीत हे प्रशिक्षण पार पडले. सरकारी शाळांमधील शिक्षकांनी या प्रशिक्षणावर बहिष्कार घालून शाळांवर उपस्थित राहणे पसंत केले. त्यामुळे महापालिकेच्यावतीने केवळ अंगणवाडी शिक्षिकांना निवडणुकीचे प्रशिक्षण देण्यात आले. घरोघरी सर्व्हे केल्यानंतर त्याची माहिती ऑनलाईन कशी भरावी? त्याचबरोबर ओळखपत्रामध्ये बदल असेल तर कशा पद्धतीने काम करावे? याची सविस्तर माहिती प्रोजेक्टरद्वारे देण्यात आली.









