वृत्तसंस्था/ पाँडिचेरी
देवधर करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेतील शुक्रवारी येथे खेळवण्यात आलेल्या सामन्यात दक्षिण विभागाने आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर नॉर्थ-इस्ट विभागाचा 9 गड्यांनी दणदणीत पराभव करून गुणतक्त्dयात आघाडीचे स्थान मिळवले.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना नॉर्थ-इस्ट संघाचा डाव 49.2 षटकात 136 धावात आटोपला. त्यानंतर दक्षिण विभागाने 19.3 षटकात 1 बाद 137 धावा जमवत हा सामना एकतर्फी जिंकला. या सामन्यात दक्षिण विभागाचे गोलंदाज व्ही. कविरप्पा आणि साई किशोर यांनी आपल्या भेदक आणि अचूक गोलंदाजीच्या जोरावर नॉर्थ-इस्ट संघाचा डाव गुंडाळला तर त्यानंतर रोहन कुनुमलने नाबाद अर्धशतक नोंदवून आपल्या संघा एकतर्फी विजय मिळवून दिला.
नॉथ-इस्ट संघाच्या डावामध्ये प्रियोज्योतने 104 चेंडूत 40 धावा जमवल्या. दक्षिण विभागाकडून खेळणारा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरने नॉर्थ-इस्टचा सलामीचा फलंदाज अनुप अहलावतला बाद केले. त्यानंतर व्ही. कविरप्पा आणि साई किशोर यांच्या गोलंदाजीसमोर नॉर्थ-इस्टचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. नॉर्थ-इस्टची एकवेळ स्थिती 3 बाद 31 अशी केविलवाणी होती. साई किशोर आणि कविरप्पा यांनी एकूण 6 गडी बाद केले. कविरप्पाने या स्पर्धेत आतापर्यंत तीन सामन्यात 12 बळी मिळवले आहेत. तर साई किशोरने 10 गडी बाद केले आहेत. प्रत्युत्तरादाखल खेळताना दक्षिण विभागाचा सलामीचा फलंदाज केरळचा 25 वर्षीय रोहन कनुमलने आक्रमक फटकेबाजी करत 58 चेंडूत 5 षटकार आणि 8 चौकारासह नाबाद 87 धावा झळकवल्या. रोहनचे अ दर्जाच्या सामन्यातील हे पाचवे अर्धशतक आहे. त्याने अगरवाल समवेत सलामीच्या गड्यासाठी 15.4 षटकात 95 धावांची भागीदारी केली. अगरवालने 32 धावा जमवल्या. लेमतूरने अगरवालला पायचित केले. या सामन्यातील विजयामुळे दक्षिण विभागाने स्पर्धेच्या गुणतक्त्dयात 12 गुणासह आघाडीचे स्थान मिळवले आहे.
संक्षिप्त धावफलक : नॉर्थ-इस्ट विभाग 49.2 षटकात सर्वबाद 136 (प्रियोजोत 40, व्ही. कविरप्पा 3-27, साई किशोर 3-22), दक्षिण विभाग 19.3 षटकात 1 बाद 136 (रोहन कनुमलने नाबाद 87, मयांक अगरवाल 32).









