वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जर्मनीतील ड्युसेलडॉर्फ येथे होणाऱ्या चौरंगी हॉकी स्पर्धेसाठी भारताने कनिष्ठ हॉकी संघ जाहीर केला असून या संघाचे नेतृत्व उत्तम सिंग करणार आहे तर बॉबी सिंग धामी उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार असल्याचे हॉकी इंडियाने सांगितले.
हॉकी इंडियाने या स्पर्धेसाठी 20 सदस्यीय संघाची निवड केली असून ही स्पर्धा 18 ते 22 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. भारताचे सामने इंग्लंड, स्पेन व यजमान जर्मनी यांच्याविरुद्ध होतील. पुरुषांच्या कनिष्ठ विश्वचषक 2023 स्पर्धेच्या तयारीसाठी ही स्पर्धा उपयुक्त ठरणार आहे. कनिष्ठ विश्वचषक स्पर्धा 5 ते 16 डिसेंबरपर्यंत कौलालंपूर येथे खेळविली जाणार आहे.
गोलरक्षणाची जबाबदारी मोहित एच.एस. व रणविजय सिंग यादव यांच्याकडे असेल तर शारदा नाथ तिवारी, रोहित, अमनदीप लाक्रा, अमिर अली, वारिबम नीरज कुमार सिंग व योगेंबर रावत यांच्याकडे बचाव फळीची जबाबदारी असेल. मिडफिल्डमध्ये पूवन्ना सीबी, विष्णुकांत सिंग, रजिंदर सिंग, अमनदीप, सुनीत लाक्रा, चेतन शर्मा, अमित कुमार यादव यांना निवडण्यात आले आहे. आघाडी फळीत अनुभवी अरायजीत सिंग हुंडाल, अंगद बिर सिंग, बॉबी सिंग धामी, उत्तम सिंग, सुदीप चिरमाको यांचा समावेश करण्यात आला आहे.
या दौऱ्याबाबत बोलताना प्रशिक्षक सीआर कुमार म्हणाले की, ‘विश्वचषकाच्या तयारीसाठी आम्ही खूप मेहनत घेत असून काही बाबतीत आम्हाला सुधारणा करण्याची गरज आहे. या चौरंगी स्पर्धेत आपल्या खेळाडूंची क्षमता व कौशल्य आजमावून पाहण्याची संधी मिळणार आहे.’









