मणिपूरवरून संसदेतील गदारोळ कायम
►वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लोकसभेत विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडिया’कडून सादर करण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेची तारीख सोमवारी निश्चित होऊ शकते. या चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत उपस्थित राहू शकतात. तर गोंधळामुळे लोकसभा अन् राज्यसभेचे कामकाज सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. मणिपूरमधील हिंसेवर पंतप्रधान मोदींनी संसदेत वक्तव्य करावे अशी मागणी विरोधी पक्षांची आहे, तर आम्ही चर्चेसाठी तयार असून विरोधकच यापासून पळ काढत असल्याचा दावा सरकारने केला आहे.
मणिपूरमधील घटनांवर चर्चा करण्यास पंतप्रधान मोदी तयार आहेत. विरोधी पक्षांनी परस्पर सहकार्याद्वारे सभागृहाचे कामकाज चालविण्याबद्दल विचार करावा. आम्ही सर्वपक्षीय बैठकीतच मणिपूरवर चर्चेची तयारी दर्शविली होती, परंतु सभागृहात गोंधळ घालून विरोधी पक्षांचे खासदार कामकाजात अडथळे आणत आहेत, असे केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी शुक्रवारी म्हटले आहे. पंतप्रधान मोदींकडून मणिपूरच्या स्थितीवर वक्तव्य करण्यात यावे या रणनीतीच्या अंतर्गतच विरोधी पक्षांनी हा अविश्वास प्रस्ताव आणला आहे. लोकसभेत भाजपला स्वबळावर बहुमत असल्याने हा प्रस्ताव फेटाळला जाणार हे तर निश्चितच आहे.
आजपासून शिष्टमंडळ मणिपूरच्या दौऱ्यावर
मणिपूरमधील हिंसेप्रकरणी विरोधी पक्ष केंद्र सरकारला कोंडीत पकडू पाहत आहेत. याच रणनीतीनुसार विरोधी पक्षांच्या आघाडीचे एक शिष्टमंडळ मणिपूरच्या पर्वतीय क्षेत्र तसेच खोरे क्षेत्राचा दौरा शनिवारी करणार आहे. 29 आणि 30 जुलै रोजी विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ मणिपूरमधील हिंसा प्रभावित दिलासा शिबिरांना भेट देईल. या शिष्टमंडळात 16 पक्षांचे 20 खासदार सामील असतील. या शिष्टमंडळाकडून स्थितीचा आढावा घेत पीडितांशी संवाद साधला जाणार असल्याची माहिती काँग्रेस खासदार सैयद नासीर हुसैन यांनी दिली आहे.
शिष्टमंडळात सामील खासदार
या शिष्टमंडळात काँग्रेसच्यावतीने अधीर रंजन चौधरी, गौरव गोगोई आणि फुलो देवी नेताम यांचा समावेश असेल. तर संजदच्यावतीने अनिल प्रसाद हेगडे आणि राजीव रंजन, तृणमूलकडून सुष्मिता देव, द्रमुकच्या कनिमोझी, भाकपचे सन्दोश कुमार आणि माकपचे ए. ए. रहीम या शिष्टमंडळात सामील असतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे पीपी पोहम्मद फैजल, आययुएमएलचे ईटी मोहम्मद बशीर, आरएसपीचे एन. के. प्रेमचंदन, आपचे सुशील गुप्ता, शिवसेना (युबीटी)चे अरविंद सावंत, व्हीसीकेचे डी. रविकुमार आणि थिरु थोल थिरुमावलवन, रालोदचे जयंत सिंह, सपचे जावेद अली खान आणि जेएमएमचे महुआ माजी शिष्टमंडळात सामील असणार आहेत.









