बांदा- दाणोली जिल्हामार्गावर एकेरी वाहतूक
ओटवणे प्रतिनिधी
बांदा- दाणोली या जिल्हामार्गावर बावळाट – सरमळे सिमेदरम्यानचा रस्ता अतिवृष्टिमुळे खचला असुनया खचलेल्या जिल्हामार्गाच्या डागडुजीचे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे सद्य स्थितीत याठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे शाखा अभियंता विजय चव्हाण मार्गदर्शनाखाली हे डागडुजीचे काम सुरू आहे.
रस्ता खचलेला भाग उंचावर असुन अतिवृष्टिमुळे उमळ पडून हा रस्ता खचला आहे. या खचलेल्या रस्त्याचा आंबोली आणि गोवा पर्यटन स्थळाकडे जाणाऱ्या हजारो पर्यटकांसह वाहनचालकांना फटका बसला. गेल्या चार दिवसात तीन वाहने या खचलेल्या रस्त्यात रूतली. अखेर क्रेन व जेसीबीच्या सहाय्याने ही वाहने बाहेर काढण्यात आली होती.
दरम्यान वाहतुकीच्या दृष्टीने बांदा – दाणोली हा जिल्हा मार्ग आंबोली आणि गोवा ही दोन्ही पर्यटन स्थळे कमी अंतरात जोडणारा हा मार्ग असून बांदा परिसरातून पुणे, कोल्हापूरसह बेळगाव येथे येण्या-जाण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे. त्यामुळे प्रवासासाठी या भागातील बहुतांशी वाहन चालक याच मार्गाचा अवलंब करतात. त्यामुळेच सार्वजनिक बांधकाम खात्याने या खचलेल्या रस्त्याची तात्काळ दखल घेऊन डागदुजीचे काम हाती घेतले.









