कोल्हापूर प्रतिनिधी
राज्यात नागरिकांकडून गुरूवारी (दि. 27) एका दिवसात उच्चांकी 2 लाख 67 हजार 428 सातबारा, 8-अ, फेरफार, प्रापर्टी कार्ड आदी अभिलेख डाऊनलोड करण्यात आले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जुलै महिन्यात महसूल विभागाच्या महाभूमी पोर्टलद्वारे जादा अभिलेखांचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याचे चित्र आहे. या महिन्याच्या 6 तारखेलाही उच्चांकी 2 लाख 15 हजार 428 अभिलेख डाऊनलोड झाले होते. त्यालाही मागे टाकून गुऊवारी उच्चांकी आकडा गाठला.

महसूल विभागाच्या महाभूमी पोर्टलचा अभिलेख डाऊनलोड करण्यासाठी शेतकर्यांकडून वापर झाला आहे. यामध्ये गुऊवारी (दि. 27) एका दिवसात 1 लाख 83 हजार 810 डिजिटल स्वाक्षरीत सातबारा, 68 हजार 609 डिजिटल स्वाक्षरीत 8-अ, डिजिटल स्वाक्षरीत फेरफार 4 हजार 201, डिजिटल स्वाक्षरीत 5 हजार 271 मिळकत पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) डाऊनलोड करण्यात आले. अशा प्रकारे एकूण 2 लाख 67 हजार 23 लोकांनी लाभ घेतला.
सध्या महसूल विभागाच्या या डिजिटल सुविधेचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र आहे. नागरिकांसह शेतकरी वर्गाकडून या सुविधेला पसंती दिली जात असल्याचे दिसत आहे. यामुळे या कामासाठी तलाठी किंवा अन्य अधिकारी यांच्याकडे जाण्याचे प्रमाण कमी होत आहे. निश्चितच ही बाब समाधानकारक आहे.









