गृहलक्ष्मी अर्जदारासाठी मार्गसूची : खोटी माहिती देऊन योजनेचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आल्यास कारवाईचा इशारा
प्रतिनिधी / बेळगाव
राज्य सरकारने निवडणुकीदरम्यान जाहीर केलेल्या गॅरंटी योजनेतील गृहलक्ष्मी योजनेंतर्गत महिलांना दोन हजार रुपये देण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी महिलांची झुंबड उडाली आहे. तर आयकर व जीएसटी भरणाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही, असे महिला व बाल कल्याण खात्याकडून जारी केलेल्या मार्गसूचीत नमूद करण्यात आले आहे.
एपीएल, बीपीएल व अंत्योदय रेशनकार्ड असणाऱ्यांना गृहलक्ष्मी योजनेचा लाभ घेता येणार आहे. रेशनकार्डधारक कुटुंबातील यजमान महिलेला याचा लाभ घेता येईल. रेशनकार्डवर पुरुष प्रमुख असल्यास ते बदल करून घ्यावे लागणार आहे. यासाठी अन्न व नागरी पुरवठा खात्याशी संपर्क साधण्याचे कळविण्यात आले आहे. रेशनकार्डवर महिला प्रमुख असणे गरजेचे आहे. महिलेच्या बँक खात्यावरच सदर निधी आरटीजीएस करण्यात येणार आहे, असे असले तरी सरकारकडूनही काही अटी व नियम घालण्यात आले आहेत.
मुलगा किंवा मुलगी आयकर भरत असल्यास लाभ घेता येणार
रेशनकार्डवर यजमान म्हणून असणाऱ्या महिलेकडून आयकर, जीएसटी रिटनर्स भरण्यात येत असेल तर सदर महिला या योजनेला पात्र ठरणार नाही. तसेच यजमान असणाऱ्या महिलेच्या पतीकडून आयकर व जीएसटी रिटनर्स भरण्यात येत असेल तर सदर महिलाही योजनेचा लाभ घेण्यास अपात्र असणार आहे. तर मुलगा किंवा मुलगी आयकर अथवा आयटी रिटनर्स भरत असतील तर यजमान महिलेला योजनेचा लाभ घेता येणार आहे.
खोटी माहिती देऊन योजनेचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. योजनेचा लाभ घेतलेला निधी वसूल करण्यात येणार असल्याचे मार्गसूचीत नमूद करण्यात आले आहे. पती सरकारी नोकरीत असतानाही काहीजणांकडून योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यात आले आहेत. त्यामुळे सदर अर्जदारांना लाभ घेता येणार का? यावरही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दि. 19 जुलैपासून या योजनेला प्रारंभ करण्यात आला आहे. ग्राम वन, बापूजी सेवा केंद्र, बेळगाव वन, कर्नाटक वन आदी ठिकाणी अर्ज भरण्यासाठी सोय करण्यात आली आहे. या योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिलांची केंद्रांवर झुंबड उडाली आहे.









