रेल्वेमार्गावरील मातीचा ढिगारा बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर
प्रतिनिधी / बेळगाव
कॅसलरॉक ते करंझोळ मार्गावर दोन दिवसांपूर्वी दरड कोसळली होती. रेल्वेमार्गावरील मातीचा ढिगारा बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. परंतु जोरदार पाऊस असल्याने हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे शुक्रवारीही रेल्वेमार्ग बंद राहण्याची शक्यता आहे.
करंझोळपासून काही अंतरावर दरड कोसळल्याने मागील दोन दिवसांपासून लोंढा-वास्को रेल्वेमार्ग बंद आहे. त्यामुळे काही रेल्वेंच्या मार्गात बदल तर काही रेल्वे रद्द करण्यात आल्या. निजामुद्दीन-वास्को एक्स्प्रेस बेळगावपर्यंत धावत असून त्यातील प्रवाशांना बसने वास्कोपर्यंत सोडले जात आहे. गुरुवारी 255 प्रवाशांना बेळगावमधून आठ बसेसच्या माध्यमातून वास्कोला सोडण्यात आले.
निजामुद्दीन-वास्को एक्स्प्रेस शुक्रवारीही बेळगावपर्यंतच धावणार आहे. तर रविवार दि. 30 जुलै रोजी वास्को-निजामुद्दीन एक्स्प्रेस बेळगावमधून निघणार आहे. पुणे-एर्नाकुलम एक्स्प्रेस शनिवार दि. 29 रोजी कोकण रेल्वेमार्गे वळविण्यात येणार आहे. त्याचबरोबर मिरज-कॅसलरॉक एक्स्प्रेस व कॅसलरॉक-मिरज दि. 28 ते 30 रोजी बेळगावपर्यंत धावणार असल्याचे नैर्त्रुत्य रेल्वेने कळविले आहे.









