प्रतिनिधी / पणजी
म्हादई जलतंटा लवादाने गोव्यासह कर्नाटक आणि महाराष्ट्र या तीन राज्यांना वाटून दिलेले म्हादईचे पाणी प्रत्येक राज्य किती प्रमाणात वापरते, यावर देखरेख ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या म्हादई प्रवाह प्राधिकरणासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमाद सावंत यांनी गुऊवारी विधानसभा अधिवेशनाच्या शून्य काळात सभागृहाला ही माहिती दिली. म्हादई जलतंटा लवादाने 14 ऑगस्ट 2018 रोजी तिन्ही राज्यांना म्हादई नदीचे पाणी वाटून दिले आहे. यानुसार प्रत्येक राज्याकडून होणाऱ्या पाणी वापरावर देखरेख ठेवण्यासाठी म्हादई जल व्यवस्थापन प्राधिकरण (प्रवाह) स्थापन करण्यात आले आहे. आता केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने त्या प्राधिकरणासाठी समिती स्थापन केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी पी. एम. स्कॉट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अन्य पदाधिकाऱ्यांत सचिवपदी अशोककुमार व्ही. तर सदस्यपदी वीरेंद्र शर्मा यांचा समावेश आहे. या समितीचा कार्यकाळ तीन महिन्यांचा असून त्यासंबंधी गुऊवारी मंत्रालयाने आदेश जारी केला आहे.









