पंतप्रधानांचा हल्लाबोल : राजकोटमधील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन
वृत्तसंस्था /राजकोट
देश प्रगतीपथावर जात असताना सर्वसामान्यांची स्वप्ने पूर्ण होत आहेत. देशाचा हा विकास आणि प्रगती पाहून विरोधकांचा प्रचंड जळफळाट सुरू असल्याचा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यादरम्यान विविध योजना आणि प्रकल्पांचे उद्घाटन केल्यानंतर एका जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते. गुजरात दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी राजकोट शहरातील रेसकोर्स मैदानावर विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. याप्रसंगी राजकोट शहराजवळील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांच्यासोबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. पंतप्रधानांनी गुरुवारी सौराष्ट्र नर्मदा सिंचन योजनेतील दोन प्रकल्पही राज्याला समर्पित केले. यावेळी एका जाहीर सभेला संबोधित करताना राजकोट तसेच संपूर्ण गुजरात आणि सौराष्ट्रसाठी आजचा दिवस मोठा असल्याचे ते म्हणाले. 
राजकोटमधील विमानतळ गुजरातचे पहिले ग्रीनफिल्ड विमानतळ आहे. याची उभारणी 1,405 कोटी ऊपये खर्चून करण्यात आली. राजकोटपासून सुमारे 30 किमी अंतरावर असलेल्या हिरासर गावात हे केंद्र 1,025.50 हेक्टर (2,534 एकर) क्षेत्रात विस्तारले असून भारतीय विमानतळ प्राधिकरणाने 1,500 एकरवर विमानतळ बांधले आहे. विमानतळावर 3,040 मीटर (3.04 किमी) लांब आणि 45 मीटर ऊंद धावपट्टी असून 14 मोठी विमाने पार्क करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. ऑक्टोबर 2017 मध्ये पंतप्रधान मोदींनी या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन केले होते. गेल्या पाच-साडेपाच वर्षात काम पूर्ण केल्यानंतर गुऊवारी विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. याचदरम्यान रेसकोर्स मैदानावर विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधानांनी केले.









