वृत्तसंस्था /नवी दिल्ली
जपानचे परराष्ट्रमंत्री योशिमासा हयाशी गुऊवारी दोन दिवसांच्या दौऱ्यावर दिल्लीत दाखल झाले. संध्याकाळी हैदराबाद हाऊस येथे त्यांनी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. शुक्रवारी ते नवी दिल्लीतील इम्पीरियल हॉटेलमध्ये भारत-जपान फोरममध्ये सहभागी होतील. यानंतर ते शुक्रवारी सायंकाळी उशिरा मायदेशी रवाना होतील. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी त्यांच्या दौऱ्यासंबंधी सोशल मीडियावरून माहिती दिली. ‘15व्या भारत-जपान मंत्रीस्तरीय धोरणात्मक संवादासाठी जपानचे परराष्ट्रमंत्री हयाशी यांचे भारतात हार्दिक स्वागत’ असे ट्विट त्यांनी केले. हयाशी यांच्या या दौऱ्यामध्ये भारत-जपान स्पेशल स्ट्रॅटेजिक आणि ग्लोबल पार्टनरशिपच्या विविध क्षेत्रांवर व्यापक चर्चा अजेंड्यावर असल्याचेही त्यांनी नमूद केले. याचदरम्यान जपानी माध्यमांनी हयाशी यांच्या या दौऱ्यात भारत-जपान द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धिंगत होतील, असा आशावाद व्यक्त केला. भारत आणि जपानमध्ये 1952 मध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले होते. त्यापासून आजपर्यंत या संबंधांना नव्या उंचीवर नेण्यासाठी दोन्ही देशांकडून सकारात्मक पावले उचलली जात आहेत.









