इंग्लंडला मालिका बरोबरीत सोडविण्याची संधी
वृत्तसंस्था/ लंडन
ओव्हल येथे आज गुऊवारपासून अॅशेस मालिकेची अंतिम कसोटी सुरू होत असून इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूक ऑस्ट्रेलियाला 2001 नंतरच्या पहिल्या परदेशी भूमीवरील अॅशेस विजयाचा आनंद साजरा करण्यापासून रोखण्यास उत्सुक आहे. मँचेस्टर येथील चौथ्या कसोटीच्या शेवटच्या दोन दिवसांतील बहुतांश सत्रे पावसाने वाया घालविल्याने इंग्लंडला अॅशेस मालिकेचा चषक ताब्यात घेण्याचे त्यांचे स्वप्न सोडावे लागले आहे.
हवामानाच्या व्यत्ययामुळे चौथी कसोटी अनिर्णीत राहून पाहुण्यांनी मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे. पाचव्या कसोटीच्या आधी ब्रूकने ऑस्ट्रेलियाला अॅशेस मालिका जिंकण्यापासून रोखण्याची इच्छा व्यक्त केली. ‘आम्ही अजून हरलेलो नाही. त्यांनी फक्त चषक स्वत:कडे कायम ठेवला आहे. त्यामुळे जर आम्ही या आठवड्यात जिंकलो, तर मालिका बरोबरीत राहील. ते (ऑस्ट्रेलियाला मालिका जिंकण्यापासून वंचित ठेवणे) सुंदर असेल’, असे ब्रूकने म्हटले आहे.
ब्रूकला वाटते की, यजमानांनी पाचवी आणि शेवटची अॅशेस कसोटी जिंकल्यास हा नैतिक विजय ठरेल. ‘गेल्या आठवड्यात आम्ही सामन्यावर वर्चस्व गाजवत होतो. त्यामुळे नीट खेळ झाला असता, तर आम्ही तो सामना जिंकला असता असे मला वाटते. त्यामुळे जर आम्ही या आठवड्यात जिंकू शकलो, तर तो जवळजवळ नैतिक विजय ठरू शकतो, असे त्याने म्हटले आहे. या तऊण इंग्लिश फलंदाजाने पुढे सांगितले की, इंग्लिश संघाला मालिका बरोबरीत सोडविण्याचा आत्मविश्वास वाटतो.
पाचव्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ : बेन स्टोक्स (कर्णधार), मोईन अली, जेम्स अँडरसन, जोनाथन बेअरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, हॅरी ब्रूक, झॅक क्रॉली, बेन डकेट, डॅन लॉरेन्स, ऑली रॉबिन्सन, ज्यो रूट, जोश टंग, ख्रिस वोक्स, मार्क वुड.









