क्रिकेट : मयांक अगरवालच्या 98 धावा, दक्षिणेची प्रभावी गोलंदाजी
वृत्तसंस्था/ पुडुचेरी
कर्णधार मयांक अगरवालने नोंदवलेल्या 98 धावांच्या जोरावर दक्षिण विभागाने देवधर करंडक स्पर्धेतील सामन्यात पश्चिम विभागावर 12 धावांनी विजय मिळविला. या विजयानंतर गुणतक्त्यात ते आघाडीवर पोहोचले आहेत.
गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलेल्या या सामन्यात अगरवालने शानदार फलंदाजी करीत 115 चेंडूत 9 चौकारांसह 98 धावा जमविल्या. त्याच्या खेळीमुळे दक्षिण विभागाने 206 धावा जमविल्या. त्यानंतर दक्षिण विभागाच्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करीत पश्चिम विभागाला निर्धारित 194 धावांवर रोखत विजय साकारला. दक्षिण विभागाचे आता 2 सामन्यांतून 8 गुण झाले आहेत.
अगरवालने ऑफसाईडकडे अधिक फटके मारत 55 धावा काढल्या. त्याचे 9 पैकी 4 चौकार थर्डमॅनच्या दिशेने मारलेले होते. अनुभवी केबी अरुण कार्तिकसमवेत त्याने पाचव्या गड्यासाठी 50 धावांची भागीदारी केली. कार्तिकने 23 धावा केल्या. शतकासमीप आला असताना डावखुरा स्पिनर बी. पार्थने अगरवालला बाद केले. पार्थ हा पश्चिमेचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 25 धावांत 3 बळी मिळविले.
पश्चिमेचे प्रारंभीचे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर मध्यफळीतील सर्फराज खान (42), शिवम दुबे (29), अतित शेठ (40) यांनी प्रतिकार करीत विजय मिळवण्याचे प्रयत्न केले. दुबे व अतित यांनी सहाव्या गड्यासाठी 65 धावांची भर घालत 5 बाद 163 धावांपर्यंत मजल मारून दिली. पण दक्षिणेच्या स्पिनर्सनी त्यांच्यावर अंकुश ठेवत संघाला विजय मिळवून दिला. आर. साई किशोर व वॉशिंग्टन सुंदर यांनी मिळून पाच बळी टिपले.