हिंडन नदी पात्राबाहेर : ओला कंपनीला फटका : व्हिडिओ व्हायरल
वृत्तसंस्था/ नोएडा
उत्तर भारतात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे हिंडन नदीचे पाणी अनेक ठिकाणी धोक्मयाच्या चिन्हाजवळ आहे. उत्तर प्रदेशात सखल भागात पुराचे पाणी शिरले आहे. हिंडन नदीला आलेल्या पुरामुळे ग्रेटर नोएडातील सुतियाना गावाजवळ डम्पिंग यार्डमध्ये उभ्या असलेल्या 350 कार पाण्यात बुडाल्या. यासंबंधीची छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. इकोटेक-3 पोलीस स्टेशन हद्दीतील सुतियाना गावात हिंडन नदीच्या पात्रात ओला कंपनीचा कारचा डम्पयार्ड असून तेथे सुमारे 350 वाहने ठेवण्यात आली होती. डम्पयार्डमध्ये पाणी भरण्याबाबत ओला कंपनीच्या उच्चस्तरीय व्यवस्थापनाला नोटीस पाठवून माहिती देण्यात आली होती. मात्र, वारंवार नोटीस देऊनही येथे पार्क केलेली वाहने न हटविल्यामुळे ती पुराच्या पाण्यात बुडालेली दिसत आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये गंगा, यमुना, शारदा नदीसह अनेक नद्यांमध्ये पाण्याचा साठा झपाट्याने वाढत आहे. दिल्लीतील यमुना नदीच्या पाण्याची पातळी बुधवारीही धोक्मयाच्या चिन्हाच्या वर आहे. हिंडन नदीच्या पाणीपातळीतही वाढ झाल्यामुळे नोएडा आणि गाझियाबादमधील अनेक भागात पाणी साचले आहे. दरम्यान, आता नोएडाचा हा वाहनांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.









