अध्याय अठ्ठाविसावा
सामान्य माणसाच्या मन:स्थितीपेक्षा योग्याची मन:स्थती वेगळी असते. तिचं वर्णन करताना भगवंत म्हणाले, योग्याला तो करत असलेल्या कर्मातील मिथ्यत्व माहित असल्याने तो त्या कर्मापासून पूर्णपणे अलिप्त असतो. इतरांना ही गोष्ट खूपच आश्चर्याची वाटते कारण कर्म करूनसुद्धा फळाची अपेक्षा करायची नाही हे आश्चर्य नव्हे तर काय? असे ते म्हणतात पण ही काही अपूर्व गोष्ट नव्हे कारण तो नावापुरताच देहात असतो. केवळ योगाभ्यास पूर्ण करण्यापुरताच त्याने देह धारण केलेला असतो.
थोडक्यात देही असून विदेही अशी त्याची अवस्था असते. उद्धव म्हणाला, भगवंता देही असून विदेही ही अवस्था माझ्या काही लक्षात येत नाहीये, तेव्हा ही कल्पना थोडी स्पष्ट करून सांगा. भगवंत म्हणाले, देही असून विदेही ही संकल्पना सविस्तर समजावून घ्यायला योग्य अशीच आहे. उद्धवाची उत्सुकता अधिक न ताणता भगवंत बोलू लागले. ते म्हणाले, तू अगदी योग्य मुद्यावर स्पष्टीकरण विचारलेस. मलाही देही असून विदेहीपणे राहणाऱ्या माझ्या भक्तांबद्दल, योग्यांबद्दल आदरयुक्त प्रेम वाटते. देही असून विदेही राहणाऱ्यांची अनेक वैशिष्ट्यो आहेत. मुख्य म्हणजे त्यांनी स्वत:चे मन आणि बुद्धी पूर्णपणे मला समर्पित केलेली असते. त्यामुळे ते स्वत:हून कोणताही विचार करत नाहीत की कोणतीही हालचाल करत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून कोणते कार्य करून घ्यायचे हे मीच ठरवत असतो किंवा असेही म्हणता येईल की, ते माझेच रूप म्हणून जगात वावरत असतात आणि माझ्या त्या रूपाने कोणते कार्य करायचे हे मलाच ठरवावे लागते आणि त्याला अनुरूप अशा त्यांच्या देहाच्या हालचाली मी घडवून आणत असतो. ह्याचा परिणाम म्हणून त्याचा देह जरी उभा असला तरी त्याला आपण उभे आहोत असेही जाणवत नाही. मी त्याला खाली बसवले तर तेही त्याच्या लक्षात येत नाही. तो परिपूर्ण ब्रह्म झाला असल्याने त्याला उठणे बसणेच काय शरीराच्या कोणत्याही क्रिया जाणवत नाहीत. दोराचा साप झाला असे समजले आणि तो इतरांना चावला अशी केलेली कल्पना जशी हास्यास्पद आहे त्याप्रमाणे परिपूर्ण ब्रह्म झालेल्या योग्याला शरीराची हालचाल जाणवते ही कल्पना हास्यास्पद होय कारण शरीराची हालचाल करावी असे वाटण्यासाठी बुद्धी कार्यरत असावी लागते आणि केलेली हालचाल जाणवण्यासाठी मन थाऱ्यावर असावे लागते. योग्याने मन आणि बुद्धी दोन्हीही मला अर्पण केलेले असल्याने ते शरीरात नावाला उपस्थित असतात पण त्यांचे कार्य शून्यवत असते. उद्धवा मी भगवद्गीतेत, अनन्य-भावे चिंतूनी भजती भक्त जे मज । सदा मिसळले त्यांचा मी योग-क्षेम चालवी 9. ।22 । असे वचनच दिलेले आहे आणि ते मी निभावत असतो. ज्याप्रमाणे तान्हे मूल त्याची आई त्याच्यासाठी जे करेल ते, ते करून घेत असते. त्याप्रमाणे अनन्य भक्त पूर्णतया माझ्यावर विसंबून असतो. असे आई आणि ताह्या मुलाप्रमाणे योग्याचा देह आणि देव एक झालेले असतात. योग्यासाठी देहाचे काहीच महत्त्व उरत नाही मग देह राहिला काय आणि गेला काय सगळे सारखेच! देह गेला तरी आत्मज्ञानी माणूस येथे असल्यासारखाच असतो. भगवंत सांगत आहेत त्याचा प्रत्यय कित्येक अवतारी पुरुषांच्या बोलण्यातून येतो. समाधी घेताना ते म्हणतात, माझा देह जरी तुम्हाला येथून पुढे दिसणार नसला तरी तुमच्या कल्याणासाठी मी येथेच आहे. मी कुठेही जात नाही. त्यामुळे तुमच्यासाठी परत येण्याचा प्रश्नच नाही. ह्याला धरूनच नामदेव महाराज तर स्पष्टच म्हणतात, देह जावो अथवा राहो । पांडुरंगी दृढ भावो ।1। चरण न सोडी सर्वथा । आण तुझी पंढरीनाथा ।2। वदनीं तुझे मंगलनाम । हृदयी अखंडित प्रेम ।3। नामा म्हणे केशवराजा । केला पण हा चालवी माझा ।4। नामदेवरायांची भाषा अगदी स्पष्ट असल्याने त्यावर वेगळ्या स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही.
क्रमश: