एचडीएफसीसोबत स्विगीचा व्यवहार
नवी दिल्ली :
बँकिंग क्षेत्रातील दिग्गज खासगी बँक एचडीएफसी बँक आणि खाद्यपदार्थ पुरवठा करणारी कंपनी स्विगी यांनी संयुक्तपणे को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे. एचडीएफसी बँकेने बुधवारी सांगितले की या हालचालीमुळे स्विगीचा क्रेडिट कार्ड स्पेसमध्ये प्रवेश झाला आहे आणि कार्ड मास्टरकार्डच्या पेमेंट नेटवर्कवर कार्य करणार असल्याची माहिती दिली आहे.
क्रेडिट कार्ड कधी आणि कसे मिळेल?
स्विगी क्रेडिट कार्डचे रोलआउट स्विगी अॅपवर पुढील 7-10 दिवसांत सुरू होईल आणि अनेक टप्प्यांत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती आहे. यासोबतच सर्व पात्र ग्राहकांना यासाठी अर्ज करण्याची संधी मिळेल, असे बँकेने यावेळी स्पष्ट केले आहे.
या नवीन क्रेडिट कार्डचा वापर केल्यावर स्विगी वापरकर्त्यांना थोडा नफाही मिळेल. जर वापरकर्त्यांनी स्विगीद्वारे ऑर्डर केली जसे की फूड डिलिव्हरी, किराणा डिलिव्हरी, डायनिंग आउट आणि इतर सेवा तसेच या कार्डद्वारे पैसे दिले तर वापरकर्त्यांना 10 टक्के कॅशबॅकदेखील मिळणार आहे.
याशिवाय खरेदीदारांना अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, नायका, ओला आणि उबरसह इतर अनेक प्लॅटफॉर्मवर केलेल्या खरेदीवर 5 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. याव्यतिरिक्त, ग्राहक इतर सर्व खर्चांवर 1 टक्के कॅशबॅक घेऊ शकतात. कॅशबॅक स्विगी मनीच्या स्वरूपात असेल.