राकसकोप जलाशयाचे दोन दरवाजे उघडल्याने पिके पाण्याखाली : नुकसानीचा शेतकऱ्यांना फटका
वार्ताहर /उचगाव
राकसकोप जलाशयाचे दोन दरवाजे उघडल्याने मार्कंडेय नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली असून मार्कंडेय नदीला महापूर आल्याची परिस्थिती उद्भवली आहे. नदीच्या दुतर्फा पसरलेल्या हजारो एकर जमिनीतील कोवळी पिके पाण्याखाली गेली आहेत. गेल्या पंधरा-वीस दिवसापासून भातरोप लागवडीत घेतलेले कष्ट आता आलेल्या पुरात वाहून जाणार या चिंतेने शेतकरी हतबल आहे. एनकेन प्रकारे शेतकऱ्यांची नेहमीच कुचंबणा होते. निसर्गावरती अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्याला सातत्याने निसर्गाशीच सामना करत अवलंबून राहावे लागते. एकीकडे चालूवर्षीच्या खरीप हंगामात पावसाने दगा दिला. उशिरा सुरू झालेल्या पावसाशी सामना करत शेतवडीतील भात, भुईमूग, बटाटे, रताळी, मिरची, कुळीथ, सूर्यफूल अशी विविध पिके व वेगवेगळा भाजीपाला यांची नुकतीच लागवड करण्यात येत असतानाच पावसाने जोर केला. मार्कंडेय नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी वाढत, वाढत अखेर नदीला महापूर आला. आणि नदीच्या दुतर्फा हजारो एकर जमिनीत कोवळी पिके जमिनीच्या वर डोकावत असतानाच या महापुराच्या पाण्यात बुडून गेली. जर पूर लवकर ओसरला नाहीतर शेतकऱ्यांची मेहनत वाया जाणार आहे. आलेली कोवळी पिके कुजून, खराब होऊन शेतकऱ्यांना दुबार लागवड व पेरणी करण्याचीही वेळ येईल या कचाट्यात शेतकरी अडकल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. नुकसान झाल्यास दुसरीकडे शासन मात्र शेतकऱ्याला म्हणावी तशी साथ देत नाही. शेतातील पिकांना वापरण्यात येणाऱ्या रासायनिक खतांच्या किमती आज गगनाला भिडल्या आहेत. अशी महागडी खते घालून लागवड केलेल्या पिकांचे जर नुकसान झाले तर शेतकऱ्यांनी जगावे कसे, या दडपणाखालीच शेतकरी आहेत.









