भुरुणकी येथील पडझड झालेल्या घरांची पाहणी, नुकसानग्रस्तांना पालकमंत्र्यांकडून धनादेश सुपूर्द
खानापूर : खानापूर तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील अनेक घरांची पडझड झाली आहे. तसेच पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याची माहिती पालकमंत्री सतिश जारकीहोळी यांना मिळताच त्यांनी मंगळवारी दुपारी खानापूर तालुक्याचा दौरा केला. मंत्री जारकीहोळी यांनी थेट भुरुणकी येथे जावून पडझड झालेल्या घरांची पाहणी केली. नुकसानग्रस्तांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. व त्यांना शासकीय मदत सुपूर्द केली. यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अंजली निंबाळकर, जिल्हाधिकारी नितेश पाटील, डीवायएसपी रवि नाईक, तहसीलदार प्रकाश गायकवाड व इतर अधिकारी उपस्थित होते. तालुक्यात गेल्या दहा दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे नदी नाल्यांना पूर आला असून तालुक्यात आतापर्यंत 87 घरांची पडझड झाली आहे. पावसाचा जोर पाहता पुन्हा घरांची पडझड होण्याची शक्यता आहे. नुकसानग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी पालकमंत्री मंगळवारी खानापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी थेट भुरुणकी येथे जावून नुकसानग्रस्त खैरुनिसा हेरेकर, गोपाळ तारवाड यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. आणि तातडीची मदत म्हणून प्रत्येकी 1 लाख 20 हजारचा धनादेश आणि साहित्य दिले. तसेच राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या निर्देशानुसार नुकसानग्रस्तांना मदत देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी मंत्री जारकीहोळी म्हणाले, खानापूर तालुका हा अती पावसाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी 2019 चा पुराचा तडाखा आम्ही सर्वांनी अनुभवला आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन पुराच्या संकटाला तोंड देण्यासाठी सज्ज असून खानापूर तालुक्यात दुर्गम भागात ज्या ठिकाणी वनखात्याचे अडथळे आहेत. त्या ठिकाणी छोटे छोटे लोखंडी पूल उभारुन दळणवळणाची सोय करण्याची योजना असून त्यासाठी शासनदरबारी प्रयत्न सुरू आहेत. येत्या काही दिवसात यासाठी निधीची घोषणा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भुरुणकी येथे यावेळी समस्या ऐकून घेण्यासाठी मंत्र्यांनी छोटेखानी सभा घेतली होती. दरम्यान माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी खानापूर तालुका मार्केटींग सोसायटीत खतविक्रीचा मोठा गैरव्यवहार होत आहे. मात्र जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकारी यावर कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. गैरव्यवहारामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. यासाठी तातडीने याची चौकशी करावी, अशी मागणी केली. तसेच टोलआकारणी विरोधात जिल्हाधिकाऱ्यानी इतर कोणत्याही बाबीचा योग्य विचारविनिमय न करता फक्त 12 कि. मी. रस्ता तयार असताना 50 कि. मी. चा टोल आकारण्यात येतो. यासाठी रस्ता पूर्ण होईपर्यंत टोल आकारणी करण्यात येऊ नये, अन्यथा आम्ही उग्र आंदोलन करू, असा इशारा दिला.









