जिल्ह्यातील अनेक गावे जलमय, शेकडो घरांमध्ये घुसले पाणी, शेतजमीन पाण्याखाली
कारवार : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील कारवार, अंकोला, कुमठा, होन्नावर व भटकळ तालुक्यांच्या बरोबरीने घाटमाथ्यावरील जोयडा, दांडेली, शिरसी, सिद्धापूर आणि यल्लापूर तालुक्यावरील पावसाची जोरदार फटकेबाजी सुरू असल्यामुळे किनारपट्टीवर वाहणाऱ्या काळी, गंगावळी, अघनाशिनी, गुंडबाळ नद्यांना महापूर आला आहे आणि भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. तिकडे जिल्ह्यात उगम होऊन पूर्वेकडे झेपावणाऱ्या वरदा नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. सुदैवाची बाब म्हणजे होन्नावर तालुक्यातून वाहणाऱ्या शरावती नदीने अद्याप तरी धोक्याची पातळी ओलांडलेली नाही. काळी नदीमुळे कारवार तालुक्यात, गंगावळी नदीमुळे अंकोला तालुक्यात, अघनाशिनी नदीमुळे कुमठा तालुक्यात, गुंडबाळ नदीमुळे होन्नावर तालुक्यात तर वरदा नदीमुळे शिरसी तालुक्यात विशेष करून वनवासी भागात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील अनेक गावे जलमय झाली आहेत. मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या 24 तासात जिल्ह्यात 29 घरांची भागश: हानी झाली आहे. तर दोन घरांची पडझड मोठ्या प्रमाणात झाली आहे. घरांची सर्वाधिक पडझड मुंदगोड तालुक्यात झाली आहे. पाच जनावरांचा पावसामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जोयडा तालुक्यातील दोन आणि यल्लापूर तालुक्यातील तीन जनावरांचा समावेश आहे. पूर पीडितांसाठी सहा आसरा केंद्रे सुरू केली आहेत. यामध्ये कुमठा तालुक्यातील एक आणि होन्नावर तालुक्यातील पाच आसरा केंद्रांचा समावेश आहे. या केंद्रांमध्ये 191 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी निघून जाण्याचे आवाहन
कुमठा तालुक्यातून वाहणाऱ्या अघनाशिनी नदीने रौद्ररुप धारण केले आहे. केंद्रीय जल आयोगानुसार या नदीची धोक्याची पातळी 17 मीटर इतकी निश्चित केली आहे. तथापि मंगळवारी सकाळी ही पातळी 17.60 मीटर इतकी होती. त्यामुळे तालुक्यातील संतेगुळी परिसरात पाणीच पाणी झाले. गंगावळी नदीला आलेल्या पुरामुळे हिचकड सुर्वे, दांडिया, होन्नेबैल आदी गावे जलमय झाली आहेत. ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी निघून जाण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यातील शाळांना आजही सुटी
पावसाचा जोर वाढल्याने जिल्ह्यातील कारवार, हल्याल, दांडेली आणि जोयडा तालुक्यातील अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक शाळांना व पदवीपूर्व महाविद्यालयांना जिल्हाधिकारी प्रभुलिंग कवळीकट्टी यांनी आज बुधवारीही सुटी जाहीर केली आहे. तसेच इतर तालुक्यातील पावसाचा आढावा घेऊन सुटीबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार संबंधित तहसीलदारांना देण्यात आला आहे.









