लाखो रुपये खर्च करूनही आसन व्यवस्थेचे तीनतेरा : भटक्या जनावरांचा वावर वाढला, स्वच्छता करण्याची प्रवाशांची मागणी
बेळगाव : रेल्वे स्थानकासमोरील कारवार बसस्थानकाची उभारणी करूनही ते कुचकामी ठरू लागले आहे. पावसामध्ये थांबणेदेखील त्या ठिकाणी अवघड झाले आहे. या बसथांब्यांमध्ये भटकी जनावरे राजरोसपणे वावरत आहेत. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेले बसस्थानकही कुचकामी ठरत आहे. कारवार, गोवा यासह विविध भागाच्या बसेस या ठिकाणांहून जात असतात. रेल्वे स्थानकासमोरच हे बसस्थानक आहे. पूर्वी तर या बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागाला बस सोडण्यात येत होत्या. या ठिकाणांहूनच येळ्ळूर, किणये, कर्ले, नंदिहळ्ळी, गर्लगुंजी, खानापूर यासह इतर परिसरातील बस सोडल्या जात होत्या. त्यामुळे मोठी वर्दळ होती. मात्र आता मध्यवर्ती बस स्थानकांतूनच या गावांना बस सोडल्या जात आहेत.
आसणे खराब झाल्याने तीव्र नाराजी
सध्या या बसस्थानकामध्ये कारवार, चंदगड यासह गोवा राज्यातील बसेस ये-जा करत असतात. याचबरोबर काही ग्रामीण भागाला अजूनही बसेस येथूनच सोडण्यात येत आहेत. त्यामुळे बसची संख्या ही अधिक आहे. प्रवासीही मोठ्या संख्येने येत असतात. मात्र या ठिकाणी कोणतीच सोय नसल्यामुळे समस्या निर्माण होत आहे. भटकी जनावरे या ठिकाणी वावरत आहेत. मोठ्या प्रमाणात दुर्गंधीही पसरत आहे. त्यामुळे प्रवासीवर्गातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. बसण्यासाठी आसणे ठेवण्यात आली होती. ती देखील काही दिवसांतच खराब झाली आहेत. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. महत्त्वाचे म्हणजे ग्रामीण भाग तसेच खानापूर तालुक्यातील प्रवाशी या ठिकाणांहूनच अधिक प्रमाणात ये-जा करतात. मात्र त्यांच्यासाठी कोणत्याच सोयी-सुविधा नाहीत. त्यामुळे विद्यार्थी वर्गातूनही तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. तेव्हा हा परिसर स्वच्छ करून सोयी, सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी होत आहे.









