8 महिन्यांपूर्वी मिळाले होते पद : एक महिन्यापासून बेपत्ता
वृत्तसंस्था/ बीजिंग
चीनमध्ये एक महिन्यापासून बेपत्ता असलेले विदेशमंत्री क्विन गेंग यांना मंगळवारी पदावरून हटविण्यात आले आहे. क्विन गेंग हे डिसेंबर 2020 मध्ये चीनचे विदेशमंत्री झाले होते. गेंग यांनी 10 वर्षांपर्यंत विदेशमंत्री राहिलेले वांग यी यांची जागा घेतली होती. गेंग यांना 25 जूनपासून सार्वजनिक ठिकाणी पाहिले गेलेले नाही.
चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग हे लवकरच मा झाओक्सू यांना नवे विदेशमंत्री म्हणून नियुक्त करू शकतात असे मानले जात आहे. झाओक्सू हे सध्या वरिष्ठ मुत्सद्दी असून त्यांना विदेश मंत्रालयात दुसऱ्या क्रमांकाचे स्थान प्राप्त आहे.
गेंग विषयी माहिती नाही : चीन
चीनचे विदेशमंत्री गेंग हे 4 जुलै रोजी युरोपीय महासंघाचे विदेश धोरण प्रमुख जोसेफ बोरेल यांना भेटणार होते. पंरतु ही बैठक अचानक पुढे ढकलण्यात आली. बोरेल यांना 2 जुलै रोजी यासंबंधी कळविण्यात आले होते. तसेच बैठक लांबणीवर टाकण्याचे कारण चीनने बोरेल यांना सांगितले नव्हते. 7 जुलै रोजी पहिल्यांदा पत्रकारांनी चिनी विदेशमंत्री गेंग यांच्याविषयी विचारणा केली होती. यावर चीनच्या विदेशमंत्रालयाने गेंग यांच्याविषयी कुठलीच माहिती नसल्याचे उत्तर दिले होते. 10 आणि 11 जुलै रोजी गेंग हे इंडोनेशियाच्या दौऱ्यावर जाणार होते. तसेच फिलिपाईन्सच्या अध्यक्षांसोबत त्यांची बैठक होणार होती, परंतु त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा सुरू झाली होती, कारण गेंग यांच्या ठिकाणी वांग यी यांनी दौरे केले होते.
अमेरिकन टीव्ही अँकरसोबत अफेयर
अमेरिकन नागरिक आणि टीव्ही अँकर फू जियोतियान सोबतच्या अफेयरच्या चर्चांदरम्यान गेंग बेपत्ता असल्याचे वृत्त समोर आले होते. गेंग यांच्याविरोधात विवाहबाह्या संबंधांच्या आरोपांची चौकशी सुरू असल्याचीही चर्चा आहे. गेंग आणि फू जियोतियान यांना एक मुलगा असल्याचे सोशल मीडियावर बोलले जात आहे. चीनच्या कम्युनिस्ट पक्षात अशाप्रकारच्या अफेयरला सक्त मनाई आहे.









