आमदार विजय सरदेसाई यांची मागणी : कोसळलेले छत नूतनीकरणाचाच होता भाग,कला अकादमी दुर्घटना प्रकरण
पणजी : कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे हे खोटारडे असून कला अकादमीच्या कामात घोटाळा तर आहेच परंतु कोसळलेला भाग अकादमीच्या नूतनीकरणात येत नाही, असे खोटे सांगून त्यांनी गोमंतकीय जनतेची फसवणूक केली आहे. त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी कऊन गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी त्यांच्या खोटारडेपणाचा पुरावा म्हणून व्हिडिओ (सीडी) विधानसभेत सादर केला. शून्य तासाला विजय सरदेसाई यांनी कला अकादमीच्या कोसळलेल्या खुल्या रंगमंचाच्या छताचा विषय उपस्थित केला. तो भाग कला अकादमीचाच असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. त्याचे नूतनीकरण 8 नोव्हेंबर 2022 पासून हाती घेण्यात आल्याचा दावा सरदेसाई यांनी केला आणि त्याचा पुरावा म्हणून आपल्याकडे व्हिडिओ असल्याचे सांगितले. हा व्हिडीओ जनतेने पहावा म्हणजे कशी फसवणूक होते याची प्रचिती येईल, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सभापती रमेश तवडकर यांनी सरदेसाई यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांनी खाली बसावे म्हणून पुरेपूर प्रयत्न केला पण सभापतींना न जुमानता सरदेसाईंनी आपला आवाज बुलंद केला. कला अकादमीच्या कामात घोटाळा करणारा मंत्री आता चक्क खोटे बोलून जनतेला फसवतोय असे सरदेसाई यांनी पुन्हा निदर्शनास आणले. मंत्र्यांच्या खोटेपणाचा, घोटाळ्dयाचा कळस म्हणून तो भाग कोसळला असे सांगून मंत्र्यांसाठी हा प्रकार लज्जास्पद आहे. त्यांना आता राजीनाम्याशिवाय पर्याय नाही, असे सरदेसाई म्हणाले.









