धरण जलग्रहण क्षेत्रात 20 दिवसांमध्ये 91 इंच पाऊस : मोसमातील एकूण पाऊस तब्बल 104 वर
रविराज च्यारी /डिचोली
राज्यातील सर्व धरणे फुल्ल होत असतानाच केवळ केरी सत्तरीतील अंजुणे धरण कधी भरणार? अशी चिंता सर्वांना होती. कारण धरणाच्या जलाशय क्षेत्रात आवश्यकतेनुसार पाऊसच पडत नसल्याने चिंता वाढली होती. परंतु वरुणराजाने कृपा केली आणि गेल्या आठ दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील जलसाठा आठ दिवसांतच 76.99 मीटरवरून थेट 87.55 मीटरपर्यंत पोहोचला. या आठ दिवसांमध्ये 42 इंच पाऊस पडल्याने धरणाच्या पाण्याची पातळी आठ दिवसांतच 11 मीटरने वाढली आहे. धरणाच्या पाण्याची पातळी 62 मीटर इतकी खालावली होती. पडोसे जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी धरणात पंप बसवून त्याद्वारे पाणी वाळवंटीत सोडण्याची योजना हाती घेण्यात आली होती आणि पाण्याचे पंपिंग सुरूही करण्यात आले होते. पण त्याचदिवशी (23 जून) धरणाच्या जलाशय क्षेत्रात बराच पाऊस झाला आणि धरणात पाणी आणणारे नाले काही प्रमाणात प्रवाहित झाले. त्यामुळे सर्वांनी आनंद व्यक्त केला होता. 23 जून रोजी बराच पाऊस झाला व 24 पासून हळूहळू धरणात पाणी भरायला सुरूवात झाली होती. परंतु त्यानंतर समाधानकारक पाऊस झाला नाही. 23 जून ते 5 जुलै या दरम्यान केवळ 13 इंच पाऊस झाला होता. त्यामुळे धरणाची पातळी जुलै महिना लागला तरीही बरीच खालावलेली होती.
वीस दिवसांत तब्बल 91 इंच पाऊस
5 जुलैपर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. 6 जुलैपासून पावसाने धरणाच्या जलग्रहण क्षेत्रात मुसळधार बरसात सुरू केली. 5 ते 25 जुलै या वीस दिवसांमध्ये धरणक्षेत्रात एकूण 91 इंच पावसाची नोंद झाली. त्यामुळे आतापर्यंत धरणक्षेत्रात 104 इंच पाऊस नोंद झाला आहे.
गेल्यावर्षीपेक्षा 28 इंच पाऊस अधिक
यावर्षी पावसाने आगमन करण्यास विलंब केला असला तरी मागील सर्व तूट व्याजासह भरून काढली आहे. गेल्यावर्षी (2022) 25 जुलै रोजी धरणक्षेत्रात 76 इंच पावसाची नोंद झाली होती, तर धरणाची पाणी पातळी 87.21 मीटर इतकी होती. परंतु यावेळी केवळ एका महिन्यातच 104 इंच इतका पाऊस नोंद होऊन धरणाची पाणीपातळी 88.83 इतकी वाढली आहे. म्हणजेच यावर्षी आजच्या दिवशी पावसाचे प्रमाण 28 इंच जास्त आहे. गेल्यावर्षी 2022 मध्ये 9 ऑगस्ट रोजी सर्वप्रथम पाणी धरणातून बाहेर सोडण्यात आले होते. तर यावर्षी जुलै महिन्यातच धरणातील अतिरिक्त पाणी बाहेर सोडण्याची वेळ अधिकाऱ्यांवर येणार आहे. सध्या धरणक्षेत्रात सुरू असलेला पाऊस पाहता या एक-दोन दिवसांमध्ये अंजुणे धरण 90 मीटरची पातळी गाठणार आहे. या धरणाची एकूण क्षमता 93.2 मीटर इतकी आहे. तर जोरदार पाऊस सुरू असताना 90 मीटरच्यावर धरणात साचणारे अतिरिक्त पाणी समोरील नदीत सोडून धरणाची पातळी नियंत्रणात ठेवली जाते.









